खासदार नवनीत कौर राणा मातोश्रीबाहेर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करणार

खासदार नवनीत कौर राणा मातोश्रीबाहेर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करणार

नवनीतकौर राणा

राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती व आमदार रवी राणा हे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून राज्य सरकारविरोधात भूमिका घेत आहेत. आता खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. १५ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर आंदोलन करू,’ असा इशारा खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे.

शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी राणा दांपत्य आक्रमक झाले असून नुकतेच आमदार रवी राणा यांनी मोझरी येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यामुळे पोलिसांनी रवी राणा यांच्यासह  ११० कार्यकर्त्यांना अटक केली होती. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळावी आणि लॉकडाऊन काळात आलेली वीज बिले माफ करण्यात यावीत, यासाठी आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली मोझरी येथे अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असल्याने आम्ही सुद्धा जेलमध्ये दिवाळी साजरी करू, असा इशारा रवी राणा यांनी दिला. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. तर सरकार विरोधात मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली.

First Published on: November 13, 2020 9:00 PM
Exit mobile version