औरंगाबाद महापालिकेची सत्ता मिळताच पहिल्याच दिवशी संभाजीनगर नामकरण करू – चंद्रकांत पाटील

औरंगाबाद महापालिकेची सत्ता मिळताच पहिल्याच दिवशी संभाजीनगर नामकरण करू – चंद्रकांत पाटील

औरंगाबाद महापालिकेवर भाजपची सत्ता आल्यावर आम्ही पहिल्याच दिवशी औरंगाबादचे नाव बदलून घेतो, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. म्हणूनच आम्ही नामकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहोत असे ते पत्रकार परिषदेत म्हणाले.

याआधी विलासराव देशमुख यांच्या काळात हा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देऊन मागे घेण्यात आला होता. पण आता नव्याने प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया करावी लागेल. औरंगाबाद महापालिकेत हा प्रस्ताव मंजुर झाला की राज्य सरकारसमोर येईल, त्यानंतर केंद्रात नगर विकास विभागाकडे हा प्रस्ताव मंजुर करून घ्यावा लागेल असे चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण ठिकाठिकाणचे पुतळे हटवले बऱ्याच ठिकाणची नावे बदलली. ज्यांनी आपल्या देशावर आक्रमण, जुलूम केले त्यांचे नाव छाताडावर घेऊन का मिरवायचे ? असा सवाल चंद्रकांतदादा पाटील यांनी केला.

आमची सत्ता असताना नामकरणाचा प्रस्ताव झाला नाही, म्हणजे आता होणार नाही अशी भाजपची भूमिका नाही. संपुर्ण भाजप एकमताने या मुद्द्यावर ठाम आहे असे ते म्हणाले. त्यामुळेच औरंगाबाद महापालिकेवर सत्ता आल्यास पहिल्याच दिवशी आम्ही हा ठराव संमत करून घेऊ असे ते म्हणाले.


हेही वाचा – ‘महाराष्ट्रद्रोही भाजपाचा खरा मुखवटा आला समोर’

First Published on: January 4, 2021 2:21 PM
Exit mobile version