जेव्हा तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही काय केलं? राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांना उलट सवाल

जेव्हा तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही काय केलं? राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांना उलट सवाल

radhakrushna vikhe patil

राज्यात सत्तांतर होऊन शिंदे – फडणवीस सरकार आले. हे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मोठे निणर्य घेतले आहेत. अशातच भू-विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना 964 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. सरकारच्या याच निर्णयावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मागील 10 वर्षांत भू – विकास बँकेने एका तरी शेतकऱ्याला कर्ज दिले का? ही बँक अस्तित्वात तरी आहे का?  अशातच मागिल 25 ते 30 वर्षापासून बँकेने कर्ज वसुली केली नाही. राहिलेले कर्ज वसूल होणार नाही, हे कळल्यावर सरकारने कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला, अशी टीका सुद्धा शरद पवार यांनी केली.

दरम्यान शरद पवार यांनी टीका केल्यानंतर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यावर प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार यांचे नाव न घेता विखे पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे. “शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर अद्यापही भू-विकास बँकेचे बोझे आहेत. आता ते 100 टक्के माफ झाले असून लोक त्यातून मोकळे झाले आहेत. लोक कायमचे परावलंबी राहायला हवेत. शेतकरी किंवा कार्यकर्ते परावलंबी राहिल्याशिवाय नेत्याचं महत्त्व वाढत नाही, असं राजकारण त्यांनी अनेक वर्षांपासून केलं आहे. त्यामुळे या निर्णयाचे त्यांना दु:ख होणे स्वाभाविक आहे” एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

दरम्यान “शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार एक पाऊल टाकत आहे, हे पाहून त्यांना दु:ख होत आहे. भू-विकास बँकेची रक्कम जर जुनी होती.  तर तुमच्या काळात त्या माफ का नाही केल्या?  तेव्हा तुमचं सरकार होतं, तेव्हा तुम्ही काय करत होता? असा उलट सवाल विखे पाटील यांनी केला. त्यामुळे अशाप्रकारचं विधान करताना त्यांनी पूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे” असा टोलासुद्धा भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटल यांनी पवारांना लगावला.


हे ही वाचा – पुराव्याशिवाय पतीला स्त्रीलंपट आणि मद्यपी म्हणणे ही क्रूरता – मुंबई उच्च न्यायालय

First Published on: October 25, 2022 9:46 PM
Exit mobile version