नोटबंदी, 258 किलो सोने आणि श्रीधर पाटणकर; नेमका घोटाळा काय?

नोटबंदी, 258 किलो सोने आणि श्रीधर पाटणकर; नेमका घोटाळा काय?

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरेंचे भाऊ श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय. अंमलबजावणी संचालनालया(ईडी)ने केलेल्या कारवाईत पाटणकरांच्या मालकीच्या 11 सदनिका जप्त केल्यात. या 11 सदनिकांची किंमत अंदाजे 6 कोटी 45 लाख रुपये इतकी आहे. एकीकडे ही कारवाई राजकीय सूडबुद्धीतून केली असून, श्रीधर पाटणकर हे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेव्हुणे आहेत, त्यामुळेच ही कारवाई केल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. तर दुसरीकडे या प्रकरणात अनेक नवनवीन खुलासे उघडकीस येत आहेत. विशेष म्हणजे याचे धागेदोरे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या नोटबंदीपर्यंत जाऊन पोहोचले असून, शेल कंपन्यांच्या माध्यमातून 258 किलो सोने खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

नेमकं हे प्रकरण काय?

8 नोव्हेंबर 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी जाहीर केली. त्यानंतर 500, 1000 च्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्या. नोटबंदीमुळे काळा पैसा रोख रकमेच्या स्वरूपात जमा असलेल्या लोकांचे धाबे दणाणले. त्यावेळी मुंबईत काही राजकीय नेत्यांच्या मदतीला हवाला नेटवर्क चालवणारे चंद्रकांत पटेल धावून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुन्या नोटा जमा करण्यासाठी 40 दिवसांची मुदत दिली होती. परंतु कोणत्याही बँकेत नोटा जमा करायच्या असल्यास सर्व कागदपत्रे द्यावी लागत होती. त्यामुळेच काळा पैसा पांढरा करण्यासाठी महेश पटेल आणि चंद्रकांत पटेल यांनी हवाला ऑपरेटर्समार्फत खोट्या शेल कंपन्या उघडल्या. त्यावेळी काही राजकीय नेत्यांनी चंद्रकांत पटेल नामक हवाला ऑपरेटर्सची कामे करणाऱ्याशी संपर्क साधला आणि त्याच्याकडे 84 कोटी रुपयांच्या स्वरूपात रोख रक्कम दिली. त्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबर 2016 दरम्यान पिहू गोल्ड आणि सतनाम ज्वेल्स या दोन शेल कंपन्यांमध्ये 84 कोटी रुपयांच्या मोठ्या रोख ठेवी जमा करण्यात आल्या. तसेच 258 किलो सोने खरेदी करण्यासाठी पुष्पक बुलियनच्या खात्यात हे शेल कंपन्यांतील पैसे हस्तांतरित करण्यात आले. पुष्पक सराफ कंपनी ही महेश पटेल, चंद्रकांत पटेल यांच्याच अधिकृत मालकीची आहे.

विशेष म्हणजे हे सगळं नोटबंदी जाहीर झाल्यापासून 40 दिवसांत घडले. बाजारात जेव्हा नव्या नोटा उपलब्ध झाल्या, त्यावेळी 258 किलो खरेदी केलेलं सोनं विकून पुन्हा रोख रक्कम जमा करण्यात आली. तसेच सोने विकल्यानंतर पुष्पक बुलियनच्या माध्यमातून दोन्ही कंपन्यांना पैसे परत देण्यात आले. त्यातून अनेक ठिकाणी मालमत्ताही घेण्यात आल्यात. 2017 ला ईडीला या घोटाळ्याची भनक लागली आणि लागलीच ईडीनं पुष्पक बुलियन आणि ग्रुप ऑफ कंपनीज विरोधात PML Act 2002 मध्ये गुन्हा दाखल केला. तसेच चंद्रकांत पटेल यांना अटकही करण्यात आली होती. त्यावेळी पत्रकार परिषद घेत काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते. 2017 मध्ये जेव्हा शिवसेनेनं मनसेचे 6 नगरसेवक फोडले, त्यावेळी त्यांना 5 कोटी रोख रकमेच्या स्वरूपात हवाला मार्गे पटेल यांनीच दिल्याचा संजय निरुपम यांनी आरोप केला होता. याआधीच ईडीनं महेश पटेल, चंद्रकांत पटेल संचलित पुष्पक बुलियनची 21 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केलीय. विशेष म्हणजे संजय निरुपम यांनी सराफा व्यापाऱ्याचे शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्याशी व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती.

महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदींमार्फत आपल्या पुष्पक समूहातील पुष्पक रिअॅलिटी या कंपनीचा निधी वळवल्याचंही सांगितलं जातंय. पुष्पक रिअलिटीने एका व्यवहारासाठी विविध स्तरांचा वापर करून 20.02 कोटी रुपयांचा निधी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याकडे वळवला. नंदकिशोर चतुर्वेदी हे अनेक शेल कंपन्या चालवतात. त्यांच्या कंपन्यांपैकी एक कंपनी हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेडमार्फत व्यवहार करण्यात आले. यामार्फत श्रीसाईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडला 30 कोटींचे कर्ज कुठलेही तारण न ठेवता देण्यात आले. म्हणजेच महेश पटेल यांचे पैसे नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यामार्फत श्रीसाईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवण्यात आले. साईबाबा गृहनिर्मिती कंपनी ही रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे. त्याच पार्श्वभूमीवर श्रीधर पाटणकरांच्या ठाण्यातील नीलांबरी प्रोजेक्ट्समधील 11 सदनिकांही ईडीनं जप्त केल्यात.


हेही वाचाः रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकरांच्या 11 सदनिका जप्त, ईडीची मोठी कारवाई

First Published on: March 23, 2022 11:54 AM
Exit mobile version