काय आहे ‘शासन आपल्या दारी योजना’, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगितले

काय आहे ‘शासन आपल्या दारी योजना’, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगितले

औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यात “शासन आपल्या दारी” कार्यक्रमाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अंतर्गत जिल्ह्यातील लाखो लोकांना फायदा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून यावेळी देण्यात आली. तसेच, या योजनेची संकल्पना नेमकी कशी तयार झाली, याबाबत देखील मुख्यमंत्र्यांकडून माहिती देण्यात आली. आजच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात लोकांनी उपस्थिती दर्शविली होती. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला जमलेली गर्दी महाराष्ट्राला दाखवण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांना केली.

हेही वाचा – “शासन आपल्या दारी” कार्यक्रमात कोणाला जबरदस्ती आणलेलं नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा मविआला टोला

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आजपर्यंत लोकांना शासनाच्या दारी जावे लागत होते. पण सरकारडे भलीमोठी यंत्रणा असताना का आपण लोकांपर्यंत जावू शकत नाही. त्यामुळे या यंत्रणेचा वापर सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे. का लोकांना त्यांच्या कामांसाठी मुंबईला, तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर बोलवायचं? त्यामुळे यातूनच शासन आपल्या दारी ही संकल्पना तयार झाली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, संभाजी नगरमध्ये 321 प्रकल्पांची संख्या आहे. शासन आपल्या दारी योजनेतून 5 हजार 457 कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात येणार आहे. हे याआधी कधीही कोणी पाहिले नव्हते. त्याचबरोबर 1 लाख 49 हजार 572 लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. तर याच कार्यक्रमाच्या माध्यमातून 551 कोटी रुपयांच्या वस्तू वाटप होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांकडून यावेळी सांगण्यात आले.

तसेच, या सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतले. एनडीआरफच्या मदतीमध्ये वाढ केली. गोगलगायींनी केलेल्या नुकसानीला मदतीच्या कक्षेत आणून शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्यामुळे या सर्वसामान्यांच्या सरकारवर जनतेचा विश्वास आहे. तर हे सर्वसामान्यांचे सरकार आल्यानंतर 28 प्रलंबित सिंचन योजनांना सुप्रीमो देण्यात आला. या निर्णयामुळे 6 लाख जमीन ओलीताखाली येणार आहे. हे सगळं काही शेतकऱ्यांसाठी करण्यात येत आहे, असेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले. तर यापुढे आता शेतकऱ्यांना सरकारचे सहा हजार आणि केंद्र सरकारचे सहा हजार असे 12 हजार मिळणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभर दौरे करीत असतांना त्यांच्या हातून ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान प्रत्येक जिल्ह्यात राबविले जात आहे. येत्या 15 जूनपर्यंत किमान 75 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देण्याचा सरकारचा मानस आहे. मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातसुद्धा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या योजनेला आहे. ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात सुरू आहे. एकाच ठिकाणी एका छताखाली नागरिकांना वेगवेगळे लाभ मिळावेत अशा रीतीने योजना करण्यात आली आहे. या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी आता महालाभार्थी पोर्टलमधून नागरिक स्वत: किंवा प्राधिकृत केंद्रावर माहिती भरूनसुद्धा योजनेचा लाभ घेऊ शकतात.

First Published on: May 26, 2023 4:13 PM
Exit mobile version