दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचा प्लॅन बी काय? ‘या’ ठिकाणावर नजर

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचा प्लॅन बी काय? ‘या’ ठिकाणावर नजर

दसरा मेळव्यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात रस्सीखेच सुरू आहे. शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने परवानगी न दिल्यास शिवसेनेने इतर पर्यायांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी एमएमआरडीएला पत्र लिहीत बीकेसीतील मैदानाची मागणी केली आहे. शिवसेनेच्या भारतीय कामगारसेनेच्या मार्फत दसरा मेळाव्याच्या आयोजनासाठी पत्र लिहिण्यात आलं आहे. दसरा मेळावा बीकेसीमध्ये आयोजित करता यावा याकरता परवानगीसाठी पत्र लिहण्यात आलं आहे.

एकीकडे पाहिल्यास शिंदे गट दसरा मेळावा घेण्यासाठी आग्रही आहे. कालच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शिंदे गटाची या मेळाव्यासंदर्भात काल रात्री उशिरापर्यंत खलबतं झाली. यावेळी शिवाजी पार्कवरच दसरा मेळाव्याचा निर्धार शिंदेंनी व्यक्त केला आहे.

शिंदे गट आणि शिवसेना यांच्यामध्ये शिवाजी पार्कनंतर दुसरा पर्याय काय?, याबाबत चाचपणी सुरू आहे. सोमवारी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी वांद्रा कुर्ला संकुलाच्या मैदानाचा उल्लेख केला होता. त्यामुळे शिवाजी पार्कवर परवानगी नाही मिळाली तर शिंदे गटाचा मेळावा वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा होणार? उद्धव ठाकरेंचा की शिंदे गटाचा? या संदर्भात मुंबई महापालिका लवकरच निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.


हेही वाचा : ममता बॅनर्जींच्या नेतृत्वात बंगाल हे कायदा सुव्यवस्थाहीन राज्य, रविशंकर प्रसाद यांचा आरोप


 

First Published on: September 14, 2022 5:10 PM
Exit mobile version