शिंदे गटाच्या खासदारांच्या मतदारसंघांतच भाजपचं ‘मिशन 45’, बाळासाहेबांच्या शिवसेनेची रणनीती काय?

शिंदे गटाच्या खासदारांच्या मतदारसंघांतच भाजपचं ‘मिशन 45’, बाळासाहेबांच्या शिवसेनेची रणनीती काय?

लोकसभा निवडणूक 2024 साठी महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीनं एक विशेष रणनीती आखली आहे. भाजपनं महाराष्ट्रातील लोकसभेच्या 45 जागा खेचून आणण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. भाजपनं त्याला ‘मिशन 45’ असं नाव दिलं आहे. परंतु भाजपच्या या मिशन 45 मुळे शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात भाजप आणि शिंदे गटाच्या युतीचं सरकार आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या खासदारांचं काय होणार हाच प्रश्न आता राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे.

राज्यात 2019 ची निवडणूक शिवसेना आणि भाजपनं एकत्र लढवली होती. त्या निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले होते. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि 13 खासदार शिंदे गटात सामील झाले. त्यापैकी उद्धव ठाकरेंच्या गटात फक्त 5 खासदार राहिले. विशेष म्हणजे आता शिंदे गटाचे 13 खासदार असलेल्या मतदारसंघांतच भाजपनं मिशन 45 सुरू केल्यानं त्या खासदारांचं काय होणार याचीच चिंता आता शिंदे गटाला सतावू लागली आहे.

मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार गजानन कीर्तिकर, मुंबई दक्षिण मध्यचे खासदार राहुल शेवाळे, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, पालघरचे खासदार राजेंद्र गावित, हाणकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक, शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने आणि हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे शिंदे गटात सामील झाले आहेत.

खरं तर भाजपनं मिशन 45 सुरू केल्यानंतर शिंदे गटानंही आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केलीय. शिंदे गटानेही एक योजना तयार केली असून, त्यानुसार शिंदे गटातील 13 खासदारांच्या मतदारसंघावर विशेष लक्ष दिलं जाणार आहे. 13 खासदारांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामं राबवली जाणार असून, ती जनतेपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. शिंदे गटही पुन्हा भाजपसोबत युती झाली नाही तर स्वतंत्र मार्ग अवलंबण्याचा विचार करीत आहे. खरं तर शिंदे गट आणि भाजपची युती झाल्यानंतरही भाजप शिंदे गटाचे आमदार आणि खासदार असलेल्या मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला आहे. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं शिंदे गटाच्या नेत्यांच्या त्या मतदारसंघात कामाला सुरुवात केलीय. त्यावर भाजप नेते म्हणतात, आमच्या विकासकामांचा मित्र पक्षांना फायदा होणार आहे. तसेच ते मित्र पक्षाच्या खासदारांनाही फायदेशीर ठरेल. परंतु जर भाजपनं मिशन 45 ला सुरुवात केलीय तर त्याचा शिंदे गटाला किती फायदा होईल हाच प्रश्न आता त्या खासदारांना पडू लागला आहे.


हेही वाचाः अदानींविरोधात महावितरणाचे कर्मचारी आक्रमक, तीन दिवस संपामुळे वीजपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता

First Published on: January 3, 2023 7:14 PM
Exit mobile version