राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींमागे नक्की काय शिजतंय?

राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींमागे नक्की काय शिजतंय?

शरद पवार

गेल्या आठवड्यापासून राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या अचानक भेटीगाठी वाढल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटी राज्याच्या प्रश्नापुरत्या मर्यादित नसून सत्ताबदलाविषयी काही शिजतंय काय, याविषयी राजकीय वर्तुळात शंका व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गेल्या आठवड्यात भेट झाली होती. त्याच्या दुसर्‍याच दिवशी एकनाथ खडसे पवारांच्या भेटीला गेले होते. या दोन भेटी नक्की कशासाठी होत्या, याविषयी तर्क वितर्क सुरू असताना सोमवारी सकाळी बाळासाहेब थोरात यांनी सिल्वर ओकवर जाऊन पवारांबरोबर बातचीत केल्याने दबक्या आवाजातील चर्चा पुन्हा रंगली.

महामंडळाच्या नियुक्त्या याविषयी पवार- थोरात भेट होती, असे बोलले जाते. सोमवारी संध्याकाळी मग पवार यांनी स्वतः वर्षावर जात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने भेटीगाठींचा का केंद्रबिंदू पवार असल्याने भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रात सत्तेचा घास भाजपच्या हातून शिवसेनेने हिसकावून घेतल्याने राज्यातीलच नव्हे तर केंद्रातील शीर्षस्थ भाजप नेते अस्वस्थ आहेत. कोरोनाच्या काळात महविकास आघाडी सरकार पाडल्यास भाजपच्या प्रतिमेला मोठा धक्का बसू शकतो.

आधीच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला रोखण्यात अपयश आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा कमी झाला आहे. मात्र लवकरच कोरोनाचा संसर्ग कमी होत जाईल तेव्हा सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकणारी भाजप साम दाम दंड वापरून महाराष्ट्रावर पुन्हा एकदा आपले वर्चस्व मिळवण्यासाठी पुढे सरसावेल, असे राजकीय निरीक्षकांना वाटते. ‘झोपेतच एक दिवशी महविकास आघाडी सरकार कोसळेल’, असे भाजप नेत्यांना वाटते त्यामागे गोवा, कर्नाटक आणि मध्य प्रदेशची सत्ता बळकावण्याचा भाजपचा इतिहास विसरून चालणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

मराठा आरक्षण प्रकरणी ठाकरे मोदी यांना भेटत असले तरी या भेटीनंतर त्या दोघांची कदाचित राजकीय जवळीक वाढू शकते. बदलत्या समीकरणामुळे राजकारणातकाही होऊ शकते, असे बोलले जात आहे

First Published on: June 8, 2021 4:30 AM
Exit mobile version