मिंधे-भाजपा गँगच्या गद्दारांचे हे कोणते हिंदुत्व? सरवणकरांवरून आदित्य ठाकरेंचा सवाल

मिंधे-भाजपा गँगच्या गद्दारांचे हे कोणते हिंदुत्व? सरवणकरांवरून आदित्य ठाकरेंचा सवाल

मुंबई : सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात ते वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. याच संदर्भात ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. मिंधे-भाजपा गँगच्या गद्दारांचे हे कोणते हिंदुत्व? असा सवाल त्यांनी केला आहे.

हेही वाचा – “ओबीसी आणि मराठा समाजातील वाद मिटवण्यासाठी सरकारने तोडगा काढावा”, विजय वडेट्टीवारांची मागणी

गेल्या वर्षी गणपती विसर्जनाच्या वेळी प्रभादेवी येथे ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत राडा झाला होता. त्यावेळी आमदार सदा सरवणकर यांनी आपल्या खासगी पिस्तुलमधून गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर सदा सरवणकर यांच्यावर आर्म अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण नंतर या प्रकरणात सदा सरवणकर यांना क्लीनचीन देण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून सदा सरवणकर यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यानंतर आज, मंगळवारी सदा सरवणकर यांची सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ठाकरे गटाचे शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर हे सिद्धीविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष होते.

यावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. दादरमध्ये यापूर्वी घडला नव्हता असा प्रकार ज्याने केला, आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत ज्याने बंदूक रोखली, त्या गद्दार व्यक्तीची चौकशी आणि अटक तर सोडाच, मिंधे- भाजपा सरकारने आज त्यांना सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून बसवले, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – भाजपा लोकांची माफी मागणार का? ‘त्या’ प्रकरणावरून रोहित पवार आक्रमक

गोळी सरवणकर यांच्या बंदूकीतून चालवली गेली होती, असे नंतर पोलिसांनीही सांगितले. हिंदू सणात विघ्न आणणाऱ्या त्या व्यक्तीचे लायसन्स आणि बंदूक जप्त झाली पाहिजे होती, अटक व्हायला हवी होती! पण, या कृत्याबद्दल त्याला बक्षीसच मिळाल्याचे दिसत आहे. मिंधे-भाजप गँगच्या गद्दारांचं हे कोणतं हिंदुत्व? असा थेट सवाल त्यांनी केला आहे.

आमच्या सणवाराला, गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक रोखणारे हे सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून कसे शोभतात? खरंतर भाजपा किंवा गृहमंत्र्यांकडून या गोष्टीचा विरोध व्हायला हवा होता; पण कदाचित हे गद्दारीचे आणि महाराष्ट्रद्वेषाचे बक्षीस दिले असेल, अशी खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

First Published on: November 7, 2023 5:22 PM
Exit mobile version