Saibaba : निर्दोष मुक्तता झालेले साईबाबा कोण? नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरुन झाली होती जन्मठेप

Saibaba : निर्दोष मुक्तता झालेले साईबाबा कोण? नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरुन झाली होती जन्मठेप

नागपूर – मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रा. जी. एन. साईबाबा यांच्यासह सहा जणांची आज (मंगळवार) निर्दोष मुक्तता केली आहे. प्रा. साईबाबा यांना नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली होती. गडचिरोली सत्र न्यायालयाने 2017 मध्ये साईबाबा आणि इतर पाच जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पूर्ण करुन नागपूर खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वाल्मिकी एस.ए. मेनेझेस यांच्या घटनापीठासमोर सप्टेंबर 2023 ला साईबाबा आणि इतरांची सुनावणी झाली होती. या सुनावणीनंतर निकाल राखून ठेवण्यात आला होता. जवळपास सहा महिन्यांनी कोर्टाने या प्रकरणी निकाल देत 2017 मधील गडचिरोली सत्र न्यायालयाचा निकाल फिरवला आहे.

साईबाबावर कोणता आरोप?

गडचिरोली सत्र न्यायालयाने 2017 मध्ये प्रा. गोकरकोंडा नागा साईबाबा (जी.एन. साईबाबा) यांचा नक्षलवादाशी संबंध असल्याचा आरोप निश्चित करत त्यांच्यासह महेश टिकरी, हेम मिश्रा, पांडू नरोते, प्रशांत राही यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती तर विजय टिकरी यांना 10 वर्षांचा तुरुंगवास सुनावला होता. 2013 मध्ये गडचिरोली पोलिसांनी यांना अटक केली होती. हे सर्व आरोपी बंदी असलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओ) आणि क्रांतीकारी डेमोक्रेटिक फ्रंटचे सदस्य असल्याचा आरोप आहे.

कोण आहे साईबाबा?

प्रा. जी. एन. साईबाबा यांचा जन्म आंध्र प्रदेशातील अमलापुरम येथे झाला. 1967 एका गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांना पोलिओ झाला. तेव्हापासून ते व्हिलचेअरवर आहेत. शारीरिक विकलांग असले तरी साईबाबा हे त्यांच्या गुणवत्ता आणि बुद्धीच्या जोरावर शिक्षण घेत पुढे निघाले. त्यांनी अमलापुरम येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. हैदराबाद विद्यापीठातून एम.ए. केले. त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून पी.एचडी केली. अभ्यासू प्राध्यापक, मानवाधिकार कार्यकर्ते, लेखक अशी त्यांची विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये छबी आहे. दिल्ली विद्यापीठातील राम लाल आनंद महाविद्यालयामध्ये ते प्राध्यपक म्हणून काम करत होते. 2014 मध्ये नक्षळवादाच्या संबंधांवरुन त्यांना अटक झाल्यानंतर महाविद्यालयातून निलंबित करण्यात आले. त्यांचासह एक पत्रकार, जेएनयूमधील एक विद्यार्थी आणि गडचिरोली सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. देशाविरोधात युद्ध पुकारणे, नक्षलींशी संबंध असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले.

साईबाबांनी प्रकाश या टोपण नावाने नक्षलवाद्यांशी संपर्क ठेवला होता. त्यांना नक्षली चळवळीत सहभागी व्हायचे होते. तशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. नक्षली चळवळीत व्यवस्थापकिय भूमिकेत ते काम करु इच्छित होते. भूमिगत काम करण्याची त्यांनी तयारी दाखवली होती. असे गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. त्यानुसार त्यांच्याविरोधात यूएपीएनुसार कारवाई करण्यात आली होती. मात्र या प्रकरणी त्यांच्याविरोधात पोलिसांना पुरावे सादर करता आले नाही. त्यामुळे त्यांच्या सुटकेचे आदेश मुंबई उच्च न्यायलयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.

याआधीही निर्दोष सुटका झाली होती

साईबाबा यांची याआधी 14 ऑक्टोबर 2022 मध्ये उच्च न्यायलयाच्या घटनापीठाने निर्दोष मुक्तता केली होती. त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवत नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सप्टेंबर 2023 मध्ये या प्रकरणी सुनावणी घेऊन निकाल राखीव ठेवला होता, तो आज जाहीर करण्यात आला आहे. या निकालाला राज्य सरकार पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Breaking News : नक्षलवाद प्रकरणी जीएन साईबाबांची जन्मठेप रद्द, नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय

First Published on: March 5, 2024 2:12 PM
Exit mobile version