बाळासाहेब आणि वीर सावरकरांना भारतरत्न का दिला नाही?, संजय राऊतांचा सवाल

बाळासाहेब आणि वीर सावरकरांना भारतरत्न का दिला नाही?, संजय राऊतांचा सवाल

मुंबईः बाळासाहेबांसारखा महान नेता, वीर सावरकरांसारखा महान स्वातंत्र्ययोद्धा, क्रांतिकारक यांना भारतरत्न या किताबानं सन्मानित का केलं नाही, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी उपस्थित केलाय. संजय राऊतांनी आज मुंबईत माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते. बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा विचार आमच्या मनामनात आणि मनगटात भिनवला. वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावात आपोआपच हिंदू हृदयसम्राट या पदव्या लागलेल्या असतात आणि ती वारंवार सांगण्याची गरज नाही. वीर सावरकर हे हिंदू हृदयसम्राट आणि त्यानंतरचे एकमेव हिंदू हृदयसम्राट हे बाळासाहेब ठाकरे आहेत, असंही राऊतांनी सांगितलंय.

हिंदू हृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यायला हवा, पण तो का दिला जात नाही. हिंदू हृदयसम्राटांवर इतकंच प्रेम आहे, मग तर सावरकरांच्या बरोबरीनं बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न मिळाला पाहिजे. अनेक राजकीय नेत्यांना राजकीय स्वार्थासाठी भारतरत्न किताब देण्यात आलेला आहे. बाळासाहेबांसारखा महान नेता, वीर सावरकरांसारखा महान स्वातंत्र्ययोद्धा, क्रांतिकारक यांना भारतरत्न या किताबानं सन्मानित का केलं नाही. अर्थात त्यांना या पदव्या दिल्यानं ते मोठे होणार नाहीत. त्या पदव्या मोठ्या होतील, असंही संजय राऊतांनी अधोरेखित केलंय.

बाळासाहेबांचं स्मरण गेल्या 10 वर्षांत रोज होत राहिलंय. क्षणोक्षणी होत राहिलं. महाराष्ट्रात आणि देशात बाळासाहेबांनी जे कार्य करून ठेवलेलं आहे. त्यामुळे देशाला त्यांचं स्मरण कायम होत राहील. शिवसेनेची स्थापना ही बाळासाहेबांच्या जीवनातील एक महत्त्वाची घटना आहे. 50 वर्षांपेक्षा जास्त काळ शिवसेना अनेक घाव झेलून उभी आहे. बाळासाहेब असतानाही शिवसेनेवर पाठीत घाव झाले आणि त्यांच्यानंतरही 10 वर्षात झाले. माझ्यासारख्या माणसाने त्यांच्याबरोबर प्रदीर्घ काळ काम केले. सामनाच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून अनेक माध्यमांतून काम केले. बाळासाहेब एक उत्तम व्यंगचित्रकार, वक्ते, नेते आणि महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या जनतेची नाडी ओळखणारे लोकनेते होते, असंही त्यांनी सांगितलंय.

आजही आम्ही सगळेच बाळासाहेबांच्या विचाराला प्राधान्य देतो आणि तो विचारच पुढे घेऊन जातोय. कोणी कितीही टीका जरी केली तरी बाळासाहेबांच्या विचारांची जी मशाल आहे ती फक्त निष्ठावंतांच्याच हातात असू शकते. बाळासाहेबांच्या संपूर्ण जीवनामध्ये त्यांनी निष्ठा आणि अस्मिता या शब्दांना महत्त्व प्राप्त करून दिलं. त्याचं तेज कोणाला हिरावून घेता येणार नाही. बाळासाहेबांना जाऊन 10 वर्ष झाली, त्यानंतर शिवसेना तोडण्याचा जो प्रयत्न काही राजकीय पक्षांकडून झाला आणि पुन्हा बाळासाहेबांचे विचार आमचे म्हणतात हे ढोंग आहे. बाळासाहेबांनी सतत ढोंगाचा तिरस्कार केला. बाळासाहेबांनी सतत सांगितलं महाराष्ट्रात हे ढोंग चालणार नाही. त्या ढोंगाला लाथ मारली पाहिजे. शिवसेनाप्रमुखांनी कधीही खोटेपणा आणि ढोंग यांचा पुरस्कार केला नाही. दुर्दैवानं महाराष्ट्रात काही ढोंगी लोक आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असं सांगून जनतेची दिशाभूल करतायत. पण जनता पूर्णतः बाळासाहेब ठाकरेंशी निष्ठावान आहे. बाळासाहेब असते आणि असे कमरेखालचे घाव झाले असते तर बाळासाहेबांनी यांची अवस्था फार वाईट करून सोडली असती. बाळासाहेबांनी महाराष्ट्राला सह्याद्रीचं बळ दिलं. कारण ते स्वतः हिमालयापेक्षा जास्त मोठे होते. ते हिमालय होते. आज त्या तोडीचं नेतृत्व या राज्यात आणि देशात नाही. बाळासाहेबांच्या नावाने तोतये निर्माण झालेत ते फार काळ टिकणार नाहीत, असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.


हेही वाचाः नारायण राणेंच्या अधीश बंगल्यावर हातोडा, अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात

First Published on: November 17, 2022 11:02 AM
Exit mobile version