हातकणंगलेत का झाला राजू शेट्टींचा पराभव? वाचा ही कारणं!

हातकणंगलेत का झाला राजू शेट्टींचा पराभव? वाचा ही कारणं!

भाजपच्या विजयवारूसमोर अनेक दिग्गजांचा पराभव होत असताना महाराष्ट्रात देखील अनेक धक्कादायक निकाल लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातलाच एक धक्कादायक निकाल म्हणजे हातकणंगलेचा! गेल्या दोन टर्ममध्ये याच मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून जाणाऱ्या राजू शेट्टींना पराभवाचा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे हातकणंगलेची जागा राजू शेट्टींची हक्काची जागा म्हणून बघितली जात होती. अवघ्या लाखभर मतांनी राजू शेट्टींना शिवसेनेच्या धैर्यशील मानेंकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे आता आघाडी किंवा युती या दोन्हीकडे राजू शेट्टींची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे.


वाचा काय आहे हातकणंगले मतदारसंघातली राजकीय गणितं!

पण का झाला राजू शेट्टींचा पराभव?

१) वंचित बहुजन आघाडी – प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीकडून अस्लम सय्यद यांना उमेदवारी देण्यात आली होती. धैर्यशील मानेंना ५ लाख ८५ हजार ७७६ मतं मिळाली. राजू शेट्टींना ४ लाख ८९ हजार ७३७ मतं मिळाली. दोघांमध्ये १ लाख ४ हजार मतांचं अंतर आहे. आणि वंचित बहुजन आघाडीच्या असलम सय्यद यांना १ लाख २३ हजार ४१९ मतं मिळाली. त्यामुळे वंचितच्या उमेदवारामुळे राजू शेट्टींना मोठा फटका बसल्याचं बोललं जात आहे.

२) शेतकरी आंदोलन – हातकणंगले मतदारसंघ उसाच्या शेतकऱ्यांचा मतदारसंघ आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपीची प्रमुख मागणी अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. आणि वारंवार आंदोलन करूनही राजू शेट्टी ही मागणी पूर्ण करू शकले नाहीत. त्याची नाराजी शेतकऱ्यांच्या मनात होती.

३) सदाभाऊ खोत – सत्तेत प्रत्यक्ष सहभागी न होता सदाभाऊ खोतांना सत्तेत पाठवून स्वत: आंदोलनाचं नेतृत्व करणं राजू शेट्टींसाठी नुकसानकारक ठरलं. सदाभाऊ खोत पुढे त्यांच्याच विरोधात उभे ठाकले. शिवाय पक्षीय नेतृत्वामध्ये मतभेद झाल्यामुळे विश्वासार्हता कमी झाल्याचा फटका देखील राजू शेट्टींना बसल्याचं बोललं जात आहे.

First Published on: May 23, 2019 11:18 PM
Exit mobile version