भाजपा अंधेरी पोटनिवडणूक लढवणार का? मध्यरात्री नेत्यांची खलबतं, बैठकीत काय ठरलं?

भाजपा अंधेरी पोटनिवडणूक लढवणार का? मध्यरात्री नेत्यांची खलबतं, बैठकीत काय ठरलं?

मुंबई – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं मत व्यक्त केलंय. त्यानंतर, आमदार प्रताप सरनाईक यांनीही ही निवडणूक बिनविरोध होण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं. याचसंदर्भात चर्चा करण्याकरता भाजपाची काल रात्री महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक व्हावी असं स्थानिक नेत्यांचं मत आहे. मात्र, अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवण्यात आली आहे. दरम्यान, आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या विषयावर चर्चा करणार असल्याचंही सांगण्यात येतंय.

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांच्या बैठकीत आज काय ठरतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. तर, भाजपाने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे, तर बाळासाहेबांची शिवसेना यांनी भाजपाला समर्थन केलं आहे.

मात्र, ही पोटनिवडणूक बिनविरोध  व्हावी अशी मागणी होत असल्याने भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी काल मध्यरात्री दीड तास चर्चा केली. यावेळी बैठकीमध्ये आशिष शेलार, अंधेरी पोटनिवडणुकीतील उमेदवार मुरजी पटेल यांच्यासहीत अनेक नेते उपस्थित होते, अशी माहिती समोर येत आहे. या बैठकीत स्थानिक नेत्यांनी निवडणूक व्हावी असं मत व्यक्त केलं आहे. मात्र, अंतिम निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घ्यावा असं ठरवण्यात आलं आहे.

हेही वाचा – भाजपने ती निवडणूक लढवू नये; राज ठाकरेंची उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्राद्वारे विनंती

राज ठाकरे यांचे पत्र

एक विशेष विनंती करण्यासाठी हे पत्र आपणांस लिहितो आहे. आमदार कै रमेश लटके ह्यांच्या दुर्देवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक आहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं.

हेही वाचा- राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले मी एकटा…

फडणवीसांची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “भाजपामध्ये मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. राज ठाकरेंच्या पत्रावर मला निर्णय घ्यायचा असेल तर मला पक्षातील सहकाऱ्यांशी, वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी लागेल. तसेच बाळासाहेबांची शिवसेनादेखील आमच्यासोबत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशीही मला चर्चा करावी लागेल. राज ठाकरे यांनी चांगल्या भावनेने हे पत्र लिहीले आहे. आम्ही त्यांच्या पत्राचा नक्कीच विचार करू. यापूर्वीही आर.आर. पाटील यांच्या वेळेसची निवडणूक असेल किंवा नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुका असतील, जेव्हा-जेव्हा आम्हाला अशाप्रकारे विनंती करण्यात आली, त्यावेळी आम्ही निर्णय घेतला आहे. मात्र, या निवडणुकीत आम्ही उमेदवार दिला असताना मला पक्षात चर्चा करावी लागेल. त्यानंतरच योग्य तो निर्णय घेता येईल”, असेही ते म्हणाले.

First Published on: October 17, 2022 12:28 PM
Exit mobile version