हिंदूंच्या भावना घेऊन अयोध्येत निघालो आहे -उद्धव ठाकरे

हिंदूंच्या भावना घेऊन अयोध्येत निघालो आहे -उद्धव ठाकरे

Shivneri Fort

शिवरायांची जन्मभूमी शिवनेरी आणि राज्याभिषेक भूमी रायगडावरील माती म्हणजे हिंदूंच्या भावना घेऊन अयोध्येला निघालो आहे. माझ्यावर आरोप करणार्‍या विरोधकांची कुवत काय हे मला ठाऊक आहे, प्रत्यक्षात मंदिर कधी उभारणार, आणखी किती दिवस लोकांना मूर्ख बनवणार, असा सवाल शिवनेरी गडावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. सर्वत्र एकच प्रश्न विचारला जात आहे की शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा निवडणूक तोंडावर आली म्हणून उचलला आहे का? हो मी निवडणूक तोंडावर असतानाच राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला आहे. कारण मला ताकाला जाऊन भाडं लपविण्याची सवय नाही, पण त्यामागचा उद्देश एकच आहे, ताकाचे भांडे लपावायचे नसून काहीजणांचा भंडाफोड करायचा आहे. निवडणुका आल्या की ‘राम मंदिर वही बनायेंगे’ हे किती वर्षे आणि किती पिढ्या आम्ही ऐकत रहायचे? सत्ता हातात येऊन चार वर्षे झाली, तरी अजूनही आश्वासनांचाच पाऊस भाजप पाडत असल्याचा थेट आरोप शिवनेरी गडावरून उद्धव ठाकरें यांनी केला. अयोध्येत जाताना शिवनेरी गडावरची माती घेऊन ते जाणार आहेत. त्यासाठी उद्धव ठाकरे शिवनेरी गडावर आले होते.

केवळ राजकारणासाठी मी अयोध्येला चाललेलो नाही. आणखी किती निवडणुकांमध्ये अजून हा मुद्दा घेऊन किती दिवस आमची फसवणूक करणार आहात? हा प्रश्न विचारायला मी अयोध्येला चाललो आहे, असे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले. त्यांच्यासोबत खासदार शिवाजी आढळराव पाटील, मिलिंद नार्वेकर, जिल्हा अध्यक्ष राम गावडे, तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, आशा बुचके, अरुण गिरे, मनसेचे आमदार शरद सोनावणे आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
उद्धव ठाकरे हे २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येचा दौरा करणार आहेत. जाताना उद्धव ठाकरे शिवनेरी व रायगडावरील मातीचा कलश घेऊन जाणार आहेत. यासाठीच उद्धव ठाकरे गुरुवारी शिवनेरी गडावर आले होते. शिवनेरी गडावर शिवसैनिकांनी उत्साहात त्यांचे स्वागत केले. यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवरायांचे दर्शन घेतले.

First Published on: November 23, 2018 5:30 AM
Exit mobile version