दोन जुळ्या मुलींसह मातेचा आत्महत्येचा प्रयत्न; मुलींचा दुर्दैवी अंत

दोन जुळ्या मुलींसह मातेचा आत्महत्येचा प्रयत्न; मुलींचा दुर्दैवी अंत

प्रातिनिधिक छायाचित्र

बुलढाणा जिल्ह्यात एका मातेने आपल्या दोन जुळ्या मुलींसह विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. बुलढाण्याच्या जामोद येथील ही दुर्दैवी घटना असून दोन्ही जुळ्या मुलींचा मृत्यू झाला आहे. शनिवारी संध्याकाळी साडे सात वाजता ही घटना घडली. शितल मोहन भगत असे महिलेचे नाव असून त्रिशा आणि दिव्या असे तिच्या सहा महिन्यांच्या जुळ्या मुलींची नावे आहेत.

जामोदचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी सांगितले की, शितल भगतचे कुटुंबातिल सदस्यांबरोबर किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर तिने दोन्ही मुलींना घराबाहेर विहिरीत फेकले आणि नंतर स्वतः देखील उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. गावातील नागरिकांनी ही घटना पाहिल्यानंतर पोलिसांना याची माहिती दिली. दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शितल भगत यांना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते, मात्र प्रकृती ढासळ्यामुळे त्यांना अकोला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या तिची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. शितल यांचे पती मोहन भगत हे शेती करतात. मोहन आणि शितल या दोघांचाही हा दुसरा विवाह होता. काल अचानक त्यांनी दोन्ही मुलींसह विहीरीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामागचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

First Published on: July 14, 2019 3:10 PM
Exit mobile version