भाजपच्या यादीत महिलाराज

भाजपच्या यादीत महिलाराज

मानखुर्दमध्ये भाजपच्या दोन गटात हाणामारी

उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीने एकूण सहा जागांपैकी तब्बल चार जागांवर महिला उमेदवारांना संधी दिली आहे, तर शिवसेनेने आपल्या दोनही मतदारसंघात पुरुषांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने एकाही महिलेला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे भाजपच्या चारही महिलांची लढत पुरुष उमेदवारांबरोबरच होईल, हे स्पष्ट झाले आहे.

उत्तर महाराष्ट्रात आठ मतदारसंघ असून, आठही जागांवर गेल्या निवडणुकीत युतीचे वर्चस्व होते. शिर्डी आणि नाशिकची जागा शिवसेनेसाठी सोडण्यात आली आहे. उर्वरित सहा जागा भाजप लढवणार आहे. यात दिंडोरीतील जागेवर विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना नाकारून तेथे डॉ. भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पवार या माजी मंत्री दिवंगत अर्जुन तुकाराम पवार यांच्या स्नुषा आहेत. त्यांची लढत आता आघाडीचे धनराज महालेंबरोबर होणार आहे. रावेरची जागा एकनाथ खडसे यांची स्नुषा तथा विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना जाहीर झाली आहे. त्यांचा सामना आता माजी खासदार उल्हास पाटील यांच्याशी होणार आहे. नंदुरबार मतदारसंघातून डॉ. हिना गावित यांना पुन्हा एकदा उमेदवारीची संधी मिळाली आहे. २०१४ च्या निवडणुकीत तब्बल आठ वेळा निवडून आलेले तत्कालीन खासदार माणिकराव गावित यांचा १ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता. त्यांची लढत आघाडीचे अ‍ॅड. के. सी. पाडवी यांच्याशी होईल. जळगाव मतदारसंघात स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय पक्षातर्फे महिलेला उमेदवारी देण्यात आली आहे. स्मिता वाघ यांचा सामना आता माजी मंत्री तथा आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्याशी होणार आहे. अहमदनगरमधून मात्र भाजपने महिलेऐवजी सुजय विखे पाटील यांना कौल दिला आहे, तर धुळे मतदारसंघातून विद्यमान संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे पुन्हा एकदा उमेदवारी करणार आहेत. शिवसेनेने उत्तर महाराष्ट्रातील दोन्ही जागांवर पुरुष उमेदवार दिले आहेत. त्यात नाशिकमधून विद्यमान खासदार हेमंत गोडसे तर शिर्डीतून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा समावेश आहे. आघाडीने उत्तर महाराष्ट्रात एकाही महिलेला उमेदवारी दिलेली नाही.

First Published on: March 25, 2019 4:45 AM
Exit mobile version