नागपूर कारागृहातील महिलांचे पर्यावरणपूरक ‘सॅनिटरी नॅपकिन्स’

नागपूर कारागृहातील महिलांचे पर्यावरणपूरक ‘सॅनिटरी नॅपकिन्स’

(सौजन्य - Getty Images)

नागपूर मध्यवर्ती कारागृहातील महिला कैद्यांनी आपल्या कौशल्य विकास आणि सशक्तीकरणाच्या ध्येयपूर्तीसाठी पुनर्वसन योजनेन्वये पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिन्स बनवण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाच्या एका महिला अधिकाऱ्यानं माहिती दिली आहे. १५० वर्षांची परंपरा असलेल्या या कारागृहात कैद्यांचं कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीनं अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामध्येच या कामाचा समावेश करण्यात आला असल्याचं एनसीडब्ल्यूचे पहिले पुरुष सदस्य आलोक रावत यांनी सांगितलं आहे. आपल्या विविध उपक्रमांतर्गत महिलांना सक्षम बनवण्यासाठी देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामध्ये आता नॅपकिन्स बनवण्याचीदेखील भर पडली आहे.

तुरूंगातील नॅपकिन्स सबसिडीच्या दरात

महिला कैद्यांद्वारे तयार करण्यात आलेले हे सॅनिटरी नॅपकिन्स कमी किमतीत सबसिडीच्या दरात तुरुंगात विकण्यात येतात. यातून मिळणारा नफा हा कैद्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असून तुरूंगातून सुटल्यानंतर त्यांना हा पैसा देण्यात येईल असं आलोक रावत यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, तुरुंगामध्ये काही हातमाग ठेवण्यात आले आहेत, ज्यामधून या महिला कापड तयार करतात. दरम्यान, दोन महिला कैद्यांना वकिली अभ्यासाचं शिक्षणदेखील देण्यात आलं आहे. कायदेशीर बाबी हाताळण्यासाठी या महिला सक्षम झाल्या आहेत. मात्र त्या वकील नाहीत. त्यामुळं काही प्रकरणांमध्ये त्यांना त्यांच्या वकिलांसाठी एक आठवड्यापर्यंत थांबावं लागणार नाही.

कारागृहामध्ये गर्दी नाही

सध्या नागपूर कारागृहामध्ये अजिबात गर्दी नाही. मंजूर झालेल्या १४२ या जागेच्या संख्येमध्ये सध्या ७८ महिला कैदी कारागृहात आहेत, असं निरीक्षणात आढळून आलं असल्याचं आलोक रावत यांनी नमूद केलं आहे. तर, एकाही महिलेला एकटं ठेवण्यात आलेलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

First Published on: July 12, 2018 10:55 AM
Exit mobile version