घराघरांत लपलेल्या श्वापदांचे काय? – विजया रहाटकर

घराघरांत लपलेल्या श्वापदांचे काय? – विजया रहाटकर

विजया रहाटकर

बऱ्याचदा लहान बालकांवर लैंगिक अत्याचार करणारे बहुतांश नातेवाईक व परिचितच असतात. घराबाहेर स्वत:ची काळजी कशी घ्यायची याची शिकवण आपण मुलांना देतो. पण, घरात आणि परिचितांमध्ये लपलेल्या श्वापदांपासून स्वत:ची काळजी कशी घ्यायची याचे धडे मुलांना देण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयाेगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले. राज्य महिला आयाेगाच्या वतीने औरंगाबाद येथे आज, मंगळवारी आयोजित बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) कायद्यावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी रहाटकर बोलत होत्या. यावेळी रहाटकर म्हणाल्या, देशात निर्भया, काेपर्डी, उन्नान, कठुआ आदी ठिकाणी घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पाेक्साेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कायद्याची सामाजिक परिवर्तनाच्या अनुषंगाने सांगड घालण्याची गरज आहे. केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी, मुलांसाठी काम करणारे कैलास सत्यार्थी यांचेही शुभेच्छांचे संदेश आल्याचे या परिषदेत सांगण्यात आले.

नेमकं काय म्हणाले विजय रहाटकर?

बालकांना आता अत्याचारापासून बचाव करण्याची शिकवण देण्याची वेळ आली आहे. पाेक्साे या कायद्यात आता सुधारणा झाली असून त्यामध्ये गुन्हेगाराला चार महिन्याच्या आत शिक्षा हाेऊ शकते. शिक्षेत फाशीचीही तरतूद असल्याने ही माेठी दिलासादायक बाब असून त्याविषयीचीच जनजागृती करण्याची वेळ आली आहे. पाेक्साे कायदा हा लिंग निरपेक्ष आहे. त्यामध्ये स्त्री अथवा पुरुष जरी दाेषी असला तरी त्याला शिक्षा ठरलेली आहे. विजया रहाटकर यांनी केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधींच्या व कैलास सत्यार्थींनी शुभेच्छा पाठवल्याचे सांगितले.

औरंगाबादला पहिल्यांदाच राष्ट्रीय परिषद

महाराष्ट्रासह देशभरात बालकांवर होत असलेल्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कायद्यात कठोर बदल करून बालकांवरील लैंगिक अत्याचारासाठी मृत्युदंडाची तरतूद केली आहे. या कायद्यामध्ये करण्यात आलेली सुधारणा याविषयी सर्व समाजघटकांमध्ये सांगोपांग चर्चा व्हावी, तसेच या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्य महिला आयोगाने ही राष्ट्रीय परिषद पहिल्यांदाच आयोजित केली होती.


हेही वाचा – ‘पोक्सो’ कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय परिषद

First Published on: December 11, 2018 10:45 PM
Exit mobile version