एक्स-रे मशीनचा स्फोट होऊन चिमुकली जखमी

एक्स-रे मशीनचा स्फोट होऊन चिमुकली जखमी

प्रातिनिधिक छायाचित्र

पिंपरी-चिंचवडमध्ये एक्स-रे मशीनचा ब्लास्ट होऊन एक वर्षीय चिमुकली जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. शार्वी भूषण देशमुख असे जखमी झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. दरम्यान, घटनेमध्ये चिमुकलीची आई आणि आजोबा देखील किरकोळ जखमी झाले आहेत, अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे. या घटनेप्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या सेंटर आणि डॉक्टरांच्या विरोधात शार्वीच्या आईने तक्रार दिली आहे. तर डॉक्टरांचे म्हणणे देखील नोंदवून घेण्यात येत आहे.

ब्लास्ट झाला आणि केमिकल बाहेर आले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी शार्वीला घेऊन तिची आई आणि आजोबांसह आज दुपारी तीनच्या सुमारास MCU टेस्ट करण्यासाठी न्यूक्लेस डायग्नोस्टिक सेंटरमध्ये गेले होते. टेस्ट सुरू झाली, तेव्हा अचानक एक्स-रे मशीनच्या काचेचा भाग फुटून आवाज झाला. तसेच मशीनमधून धूर आणि केमिकल बाहेर निघाले. या स्फोटानंतर मशीन मधील केमिकल शार्वीच्या अंगावर उडाले. यात ती जखमी झाली. तर आई आणि आजोबांच्या देखील अंगावर केमिकल उडाल्याने ते देखील किरकोळ जखमी झाले आहेत. शार्वीची प्रकृती ठीक असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक निकम यांनी दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी डॉक्टर आणि सेंटरच्या हलगर्जीपणाविरोधात शार्वीच्या आई वडिलांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

First Published on: November 7, 2019 9:14 PM
Exit mobile version