१२ मार्चला पार पडणार यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळा

१२ मार्चला पार पडणार यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळा

यशवंतराव चव्हाण यांची ओळख संयुक्त आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, भारताचे उपपंतप्रधान तसेच महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री अशी आहे. देशातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्राला त्यांनी आपले अमूल्य योगदान दिले आहे. त्यामुळेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे व्यक्ती किंवा संस्थांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. उद्या रविवारी म्हणजेच १२ मार्चला या पुरस्कार सोहळ्याचे वितरण करण्यात येणार आहे.

सन २०२२ चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रख्यात उद्योगपती, व्यापारी आणि शिक्षण क्षेत्रात अग्रणी असणारे दानशूर, परोपकारी अझीम प्रेमजी यांना प्रदान करण्यात येणार आहे. ०९ मार्चला उद्योगपती अझीम प्रेमजी यांना यंदाचा आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले होते.  पुरस्कार प्रदान सोहळा १२ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार भूषविणार आहेत आणि त्यांच्याच हस्ते हा पुकस्कार देखील देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय एकात्मता, संवैधानिक मूल्यांचे जतन, भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात योगदान देणाऱ्या क्षेत्रात भरीव आणि अग्रेसर कार्य करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रतिष्ठानतर्फे नामांकन मागविण्यात येतात. पाच लाख रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराने यापूर्वी डॉ. जयंत नारळीकर, आर. के. लक्ष्मण, सुश्री महाश्वेता देवी, भारतीय वायुसेनेचे मार्शल अर्जन सिंग, आणि उद्योजक रतन टाटा आदींना सन्मानित करण्यात आले आहे.

हेही वाचा – सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर! वयोमर्यादा शिथिल

दरम्यान, या पुरस्कारासंदर्भातील तपशील प्रतिष्ठानच्या www.chavancentre.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

First Published on: March 11, 2023 12:00 PM
Exit mobile version