दोन वर्षांपासून सैन्य भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरूणाची आत्महत्या

दोन वर्षांपासून सैन्य भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरूणाची आत्महत्या

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने अग्निपथ योजना जाहीर करण्यात आली. मात्र, या योजनेनंतर देशातील काही राज्यांनी आक्षेप घेतला असून हरियाणाच्या रोहतकमध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. दोन वर्षांपासून कठोर मेहनत घेणाऱ्या आणि सैन्य भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा तरूण जींदचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे.

या योजनेच्या घोषणेनंतर बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा या राज्यांत जोरदार आक्षेप घेण्यात आल्यानंतर हरियाणाच्या रोहतकमधील एका पीजी हॉस्टेलमध्ये सचिन नावाच्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. मृत सचिन हा जिंदमधील लिजवाना येथील रहिवासी होता. मृत सचिन हा रोहतक येथे राहून सैन्य भरतीची तयारी करत होता. परंतु त्याने टोकाचे पाऊल उचलले असून या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकलेले नाहीये. तरी त्याच्या कुटुंबीयांनी त्याला सैन्यात भरती व्हायचे होते, यासाठी तो खूप मेहनत घेत होता, अशी माहिती दिली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या योजनेविरोधात अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी आणि तरुण रस्त्यावर उतरले आहेत. बिहारमधील बक्सर जिल्ह्यात रेल्वे रूळांवर उतरुन रेल रोको आंदोलन करण्यात आलं आहे. आरा येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात आली आहेत. तर छपरा येथे विद्यार्थ्यांनी रेल्वेला आग लगल्याची घटना घडली आहे.


हेही वाचा : २० जूनपर्यंत चौकशी नको, राहुल गांधींची ईडीला पत्राद्वारे मागणी


 

First Published on: June 16, 2022 7:06 PM
Exit mobile version