कंधाणेत बिबटयाच्या हल्ल्यात युवक गंभीर

कंधाणेत बिबटयाच्या हल्ल्यात युवक गंभीर

Youth injured in leopard attack at kandhane

विरगाव : कंधाणे (ता. बागलाण) येथे पहाटेच्या सुमारास पिण्याच्या पाण्यासाठी विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या अंकुश बोरसे (२१) या युवकावर मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबटयाने अचानक हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. आजुबाजुच्या शेतक-यांनी जखमी युवकाला उपचारासाठी सटाणा येथील ग्रामीण रूग्णालयात दखल केले होते. या हल्ल्यात युवकाच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली असून,  येथील डाॅक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी या युवकास मालेगाव येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे‌. या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
भगवान बोरसे हे शेतमजूर आपल्या कुटुंबातील सदस्यांसह येथे एका शेतक-याकडे सालगडी म्हणून कामास आहे. ते शेतात वास्तव्यास राहत असून, सध्या परिसरात मका पिका जोरदार व मोठे झालेले आहे. या वाढलेल्या मक्याच्या शेतांत बिबटयाच्या वास्तव्यात आता वाढ झाली आहे. चालू महिन्यापासून शेती पंपासाठी मिळणारा विद्युतपुरवठा सोमवार ते गुरूवारपर्यंत पहाटे ८ वाजेपर्यंत मिळत असल्याने नागरिकांना पहाटेच्या सुमारास पिण्यासाठी व जनावरांना लागणा-या पाण्यासाठी मोटारी चालु कराव्या लागतात. सोमवारी पहाटेच्या सुमारास पिण्यासाठी लागणारे पाणी भरण्यासाठी अंकुश बोरसे हा युवक दुचाकीने विद्युत मोटार सुरू करण्यासाठी शेतातील विहीरीवर गेला असता सावजाच्या शोधात दबा धरून बसलेल्या बिबटयाने त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे या युवकाने जीवाच्या आकांताने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. पहाटेच्या सुमारास या आरडाओरडयाने शेजारच्या शेतक-यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्यास हुसकावून लावत जखमी युवकास शासकीय रुग्णवाहिकेतुन सटाणा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती सटाणा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश साठे, एजाज शेख यांना समजताच त्यांनी तात्काळ ग्रामीण रूग्णालय गाठत जखमी युवकाची विचारपुस करून त्यास तातडीची आर्थिक मदत करत पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णवाहिकेने मालेगांव येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. उपचारानंतर रुग्णाची प्रकृती ठीक असल्याचे त्याच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
First Published on: August 3, 2020 8:40 PM
Exit mobile version