झांझरोळी धरणाला मोठे भगदाड

झांझरोळी धरणाला मोठे भगदाड

पालघर जिल्ह्यातील माहीम-केळवे लघु पाटबंधारे योजनेवरील झांझरोळी धरणाला वर्षभरापासून गळती लागली असून शनिवारी सकाळी दहाच्या सुमाराला या धरणाला भलेमोठे भगदाड पडून गंभीरे परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सिंचन क्षेत्राखालील गावकर्‍यांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून याठिकाणी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे.

नाशिक धरण सुरक्षा विभागाचे कार्यकारी अभियंता मुरकुटे यांनी ४ जानेवारी २०२२ रोजी या योजनेच्या क्षेत्रीय पाहणी दरम्यान अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. मात्र, धरणाला गळती लागल्याने आतील पाणी वाया जाणार असून भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे. केळवे माहीम गावात या धरणाचा साठा मोठ्या प्रमाणावर आहे. झांझरोळी गावाच्या वरील बाजूस धरण असल्याने धरणाच्या खालील झांझरोळी, पठार पाडा, पाटीलपाडा, धोंदलपाडा, देवशेत, मायखोप, केळवे, रावळे या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

धरणाच्या बाहेरील बाजूस धरणाच्या मुख्य विमोचकाच्या भिंतीला गळती लागली आहे. गळती सुरु झाल्यानंतर भले मोठे भगदाड पडल्याने परिस्थिती धोकादायक झाली आहे. यावर उपाययोजना म्हणून धरणातील पाणीसाठा हळूहळू कमी करण्यात येणार आहे. धरणाच्या विमोचक विहिरीस लागून असलेल्या भागाचे चित्रीकरण करण्यात येवून जेणेकरून गळती होत असलेल्या भागाचा अंदाज घेतला गेला आहे. धरणाच्या विमोचक विहिरीस लागून असलेल्या नळाच्या मुखाजवळ पाणबुड्यांच्या साहायाने ताडपत्री लावून पाणी बंद करावे.

तसेच ताडपत्री सुटू नये, याकरता वाळूच्या पिशव्या ठेवण्यात याव्यात. धरणाच्या मुख्य विमोचकाच्या उजव्या बाजूस होत असलेल्या गळतीचा विसर्ग नियमित नोंदवण्यात यावा, धरणाच्या दोन्ही बाजूस विमोचकाच्यावर असलेले गवत व झाडेझुडपे काढण्यात यावे, आदी कामे तातडीने करण्याच्या सुचना देण्यात आल्या असून त्यादृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे. माहीम केळवे धरणाची गळती गंभीर आहे. या आपत्कालीन परिस्थितीत धरणाच्या सुरक्षितेसंदर्भात २४ तास निगराणी ठेवून, आवश्यक त्या सर्व उपाययोजना व काळजी क्षेत्रीय कार्यालयामार्फत घेण्यात येत आहे, असी माहिती पालघरच्या पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे.

झांझरोळी धरणाची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार आदी यंत्रणानी घटनास्थळी तात्काळ भेट दिली असून आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये. यासाठी गाव खाली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सद्यस्थितीत धरणातील विहिरीजवळ जेसीबीच्या सहाय्याने भराव टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच स्थानिक नागरिक आणि सर्पमित्र ग्रुप सफाळे यांच्या टीमने मानवी साखळी बनवून प्लस्टिकच्या गोण्यामध्ये खडी भरून ते भगदाड बंद करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. सफाळे पोलिसांनीही धारण क्षेत्राजवळ चोख बंदोबस्त ठेवला असून रात्रीच्या सुमारास कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना महत्त्वाचे सामान बांधून ठेवण्याच्या सूचना दिल्या असून सुरक्षितस्थळी हलवण्याच्या सर्व बाबी संदर्भात उपाययोजना केल्या आहेत.

माहीम केळवे धरणाला मागील एक वर्षांपासून गळती लागली असून जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभाग यांनी सतत दुर्लक्ष केल्यामुळे या धरणाला भलेमोठे भगदाड पडून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
– प्रकाश सावर, झांझरोळी, ग्रामस्थ

First Published on: January 9, 2022 6:46 AM
Exit mobile version