१३ वर्षीय मुलीचे अपहरण करून केला लैंगिक अत्याचार; पाच जणांना अटक

१३ वर्षीय मुलीचे अपहरण करून केला लैंगिक अत्याचार; पाच जणांना अटक

अत्याचार

सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईतील आग्रीपाडा येथे राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीचे सहा जणांनी अपहरण करून तिला मध्यप्रदेश येथे एका खोलीत डांबून ठेवून एकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी या तरुणीची सुटका करून मध्यप्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यातून पाच अपहरण कर्त्यांला अटक केली असून अजून एकाचा कसून शोध घेण्यात येत आहे.
१ जुलै रोजी आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १३ वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार मुलीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांच्या तपासात अपहरण करण्यात आलेली मुलगी ही मागील फेब्रुवारी महिन्यापासून सोशल मीडियावर एका तरुणाच्या संपर्कात आली होती. या तरुणाने मुलीला भूलथापा देऊन प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अपहरण केले अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली.

आग्रीपाडा पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून या मुलीचा ठावठिकाणा मिळवला असता ही मुलगी मध्यप्रदेश आणि राजस्थान या दोन्ही राज्याच्या सीमेवर असलेल्या एका गावात असल्याची माहिती मिळाली. आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जाधव, अभिजित टेकावडे यांचे पथक मध्यप्रदेश येथे रवाना झाले. मध्यप्रदेशच्या सीमेवर असणाऱ्या एका खेड्यातील एका झोपडीत या मुलीला ठेवण्यात आले होते, तेथून तिची सुटका करण्यात करून तीन अपहरण कर्त्यांला अटक करण्यात आली उर्वरित तीन आरोपीपैकी दोघांना राजस्थानच्या एका खेड्यातून अटक करण्यात आली. पोलीस चौकशीत या मुलीवर एकाने लैंगिक अत्याचार केला असल्याचे समोर आले आहे.

मुलीचे अपहरण करण्यासाठी हे सहा जण मध्यप्रदेश येथून खासगी मोटारीने मुंबईत आले होते. त्याच मोटारीतून मुलीला घेऊन अपहरणकर्ते  मध्यप्रदेश येथे रवाना झाले होते. मध्यप्रदेश आणि राजस्थान या दोन्ही राज्यांच्या सीमेवरील असलेल्या एका झोपडयात या मुलीवर एकाने अतिप्रसंग केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

First Published on: July 7, 2020 5:30 PM
Exit mobile version