पहिल्या दिवशी १४ हजार कर्मचाऱ्यांनी नोंदवली बायोमेट्रीक हजेरी!

पहिल्या दिवशी १४ हजार कर्मचाऱ्यांनी नोंदवली बायोमेट्रीक हजेरी!

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सोमवारपासून बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक करण्याबाबच्या प्रशासनाच्या परिपत्रकाबाबत कामगार संघटनांकडून वेगवेगळ्याप्रकारे आवाहन केल्यामुळे कामगारांमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण पसरले. त्यातच प्रशासनाने बायोमेट्रीक हजेरीबाबतचे परिपत्रक रद्द करण्याची कोणतेही सुधारीत पत्रक जारी न केल्याने तब्बल १४ हजारांहून कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रीक हजेरी नोंदवली आहे. मात्र, काही कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रीक हजेरी न नोंदवता हजेरी पुस्तकात स्वाक्षरी करत उपस्थिती नोंदवली आहे. त्यामुळे अजुनही बायोमेट्रीक हजेरीबाबत कर्मचारी द्विधा मनस्थितीतच असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई महापालिकेने कर्मचाऱ्यांची उपस्थिती १०० टक्के करत बायोमेट्रीक हजेरी सोमवारपासून बंधनकारक  करण्याबाबत परिपत्रक जारी केले आहे. दरम्यान याबाबत शुक्रवारी आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत आयुक्तांनी बायोमेट्रीक हजेरीचे परिपत्रक रद्द न करता सवलत देण्याचे मान्य केले. परंतु काही कामगार संघटनांनी हे परिपत्रक रद्द झाल्याचा संदेश कर्मचाऱ्यांमध्ये पसरवून कर्मचाऱ्यांना बायोमेट्रीक हजेरी न नोंदवण्याचे आवाहन केले. परंतु त्यामुळे सोमवारी कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये बायोमेट्रीक हजेरीबाबत गोंधळाचे वातावरण पसरले होते.

सुधारीत परिपत्रक न आल्याने आपल्याला बायोमेट्रीक हजेरी नोंदवावीच लागेल,असे विविध खात्यांच्या व विभागांच्या आस्थापना विभागांनी कर्मचाऱ्यांना सुचना केल्या. त्यामुळे काहींनी बायोमेट्रीक हजेरी नोंदवली तर काहींनी नोंद बुकावरच ही हजेरी नोंदवली. महापालिकेचे एकूण १ लाख कर्मचारी असून त्यातील दिवसराभरात केवळ १४ हजार कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रीक हजेरी नोंदवली. त्यामुळे त्यांचे हजेरी पटलावर नोंदवली गेली आहे. तसेच काही कर्मचाऱ्यांनी सकाळी बायोमेट्रीक हजेरी नोंदवली नव्हती. परंतु संध्याकाळपर्यंत कोणतेही सुधारीत परिपत्रक न आल्याने त्यांनी कामावरुन घरी जाताना आपली हजेरी बायोमेट्रीकवर नोंदवली. त्यामुळे  सकाळी बायोमेट्रीक हजेरी नोंदवणाऱ्यांची संख्या कमी असली तरी संध्याकाळी त्यात वाढ झाली.

दरम्यान, कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रीक हजेरी नोंदवू नये,असे आवाहन दि म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी केले होते. तर म्युनिसिपल मजदूर युनियनचे कविस्कर यांनीही बायोमेट्रीक हजेरी स्थगित करण्याबाबत सुधारीत परिपत्रक जारी होत असल्याचे कर्मचाऱ्यांना सांगत अशाप्रकारे हजेरी न नोंदवण्याचे आवाहन केले.

बायोमेट्रीक हजेरीबाबतचे परिपत्रक रद्द करण्याबाबत प्रशासनावर दबाव वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने याबाबत हालचाली सुरु असल्या तरी आयुक्तांकडून अजुनही त्यांना हिरवा दिवा दाखवला गेलेला नाही. मात्र, भविष्यात बायोमेट्रीक हजेरीची प्रणालीचा वापर न केल्यास प्रशासन फेस स्कॅनिंगद्वारे कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदवण्याचा विचार करत असल्याचे समजते. त्यामुळे बायोमेट्रीक हजेरीला फेस स्कॅनिंग हाच पर्याय समोर ठेवून बोगस हजेरी लावणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप लावणार असल्याचेही समजते.


हे ही वाचा – ठाण्याच्या कोव्हिड सेंटर मधून रूग्ण गायब, प्रशासनाला माहितीच नाही!


 

First Published on: July 6, 2020 8:42 PM
Exit mobile version