मुंबई मनपाकडून १७ दुकाने जमीनदोस्त; मुलुंड स्थानकाबाहेरील अतिक्रमणांवर कारवाई

मुंबई मनपाकडून १७ दुकाने जमीनदोस्त; मुलुंड स्थानकाबाहेरील अतिक्रमणांवर कारवाई

मुंबई महापालिकेच्या टी विभागाअंतर्गत मुलुंड (पश्चिम) रेल्वे स्थानकाबाहेरील एस. व्ही. पी. मार्ग आणि जे. एस. डी. मार्गावरील अनधिकृत व अतिक्रमण बांधकामांवर कारवाई सत्र सुरु झाले असून, सुमारे २० वर्षांपासून प्रलंबित असलेली कारवाई पूर्ण झाली आहे. या कारवाई अंतर्गत महानगरपालिकेने एकाच दिवशी एकूण १७ दुकानांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या उप-आयुक्त (परिमंडळ ६) देवीदास क्षीरसागर आणि टी विभागाचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्या मार्गदर्शनानुसार अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. यामध्ये मुलुंड (पश्चिम) रेल्वे स्थानका बाहेरील २०० चौरस मीटर क्षेत्रावरील बांधकामे, दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. (17 encroached shops demolished by mumbai municipality)

गेली अनेक वर्षे ही कारवाई प्रलंबित होती. यापूर्वी शहर दिवाणी न्यायालयाने २९ फेब्रुवारी २०२० च्या आदेशान्वये या अतिक्रमण धारकांना नोटीस बजाविली होती. ३ मार्च २०२३ रोजी हे अतिक्रमण पाडण्याचा प्रस्ताव प्रस्तावित होता. मात्र, कोविडमुळे आणि सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कारवाई प्रलंबित होती. याबाबत दुकानदारांनी मुंबई महापालिकेने जारी केलेल्या नोटीसला आव्हान दिले होते. मात्र, शहर दिवाणी न्यायालय दिनांक २३ जानेवारी २०२३ आणि उच्च न्यायालयाच्या १६ फेब्रुवारी २०२३ आदेशांन्वये या अतिक्रमण धारकांची याचिका फेटाळण्यात आली.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सदर कारवाईत अतिक्रमण करून बांधण्यात आलेली १७ बांधकामे आणि दुकाने पाडण्यात आली. मात्र, या कारवाई दरम्यान दुकानांच्या मधोमध असलेल्या एका ‘पे अँड यूज टॉयलेट’चे नुकसान झाले. या स्वछतागृहाच्या भिंतीला तडे गेले असून हे स्वच्छतागृह असुरक्षित झाल्याचे लक्षात घेता पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून कारवाई दरम्यान ते देखील पाडण्यात आले आहे.

या कारवाईत टी विभाग कार्यालयाचे आणि रस्ते विभागाचे अभियंते, वेगवेगळ्या खात्यांचे कर्मचारी, मुकादम, कामगार तसेच जे. सी. बी., डंपरसह सदर जागेवरील अतिक्रमण निष्कासित करण्यात आले. या कारवाई प्रसंगी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, म्हणून या ठिकाणी नाल्याची बांधणी, पदपथ बांधणी आणि रस्ता रुंदीकरण प्रस्तावित आहे, अशी माहिती टी विभागाचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांनी दिली आहे.


हेही वाचा – शिंदे-फडणवीसांच्या सरकारमध्ये शेतकरी दुय्यम झालाय, बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

First Published on: March 4, 2023 5:02 PM
Exit mobile version