‘पबजी’ खेळण्यासाठी तरुणाची आत्महत्या

‘पबजी’ खेळण्यासाठी तरुणाची आत्महत्या

'पबजी' खेळासाठी तरुणाची आत्महत्या

‘प्लेयर अननोन बॅटल ग्राउंड’ (पबजी) या खेळामुळे एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनोरंजन आणि मनाच्या समाधानासाठी खेळले जाणारे मोबाईल गेम्स आता जिवघेणे ठरत आहेत. या खेळांनी आता मनोरंजनाच्या सीमा ओलांडल्या असून त्यांचा अतिरेक आता जीवावर बेतताना दिसत आहे. ‘ब्लू व्हेल‘, ‘पॉकिमॉन गो’ हे त्याचेच एक मोठे उदाहरणे आहे. एका १९ वर्षाच्या तरुणाला पबजी खेळण्यासाठी महागडा फोन घेऊन न दिल्याने त्या तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. नदीम शेख असे या तरुणाचे नाव आहे.

नेमके काय घडले?

आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण पबजी खेळताना दिसतात. मात्र या खेळाचा अतिरेक होताना दिसत आहे. कुर्ला पूर्व येथील वर्षा आदर्श सोसायटीत नदीम आपल्या कुटुंबासोबत राहत होता. या तरुणाला पबजी खेळण्याचे व्यसन लागले होते. पबजी हा खेळ खेळण्यासाठी नदीम आपल्या भावाकडे महागडा मोबाईल मागत होता. त्याकरता नदीमला ३७ हजार रुपये हवे होते. यावरुन गुरुवारी त्याने भावाशी वाद देखील घातला. भावाने नदीमला २० हजार देण्याची तयारी दाखवली, पण मला पूर्ण रक्कम हवी आहे आणि मला तोच मोबाईल घ्यायचा आहे असा तकादा नदीमने भावाकडे लावला.

आत्महत्या करण्यापूर्वी नदीम रात्री २ वाजेपर्यंत पबजी गेम खेळत होता. त्याच्या भावाने त्याला खेळ बंद करुन झोपण्यास सांगितले. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्याचा भाऊ टॉयलेटला जाण्यासाठी उठला असता त्याला धक्काच बसला. किचनमधील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने नदीमने आत्महत्या केल्याचे दिसले. याप्रकरणी नदीमच्या भावाने नगर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला असल्याची माहिती समोर आली आहे.


वाचा – ‘पबजी’ गेममुळे तरुणाच्या डोक्यावर परिणाम


 

First Published on: February 4, 2019 8:19 AM
Exit mobile version