दिलासा! मुंबईत एका महिन्यातच कोरोनाच्या २ लाख चाचण्या!

दिलासा! मुंबईत एका महिन्यातच कोरोनाच्या २ लाख चाचण्या!

कोरोना विषाणू

मुंबईत कोरोनाची लागण तपासण्यासाठी करण्यात येणाऱ्या चाचण्यांनी ५ लाखांचा टप्पा पार केला आहे. ३ जुलै रोजी मुंबईत ३ लाख ४५ हजार एवढ्या चाचण्या झाल्या होत्या. तर ३ ऑगस्टमध्ये ही चाचण्यांची संख्या ५ लाख ५२ एवढी झाली आहे. त्यामुळे एका महिन्यातच २ लाख ७ हजार एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. कोविड १९ संसर्गाच्या प्रारंभापासून अधिकाधिक वाढवण्यावर महापालिकेने भर दिला आहे. विशेष म्हणजे चाचण्या वाढूनही कोरोनाचा आजार मुंबईत नियंत्रणात आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दरदिवशी ११०० ते १३०० पर्यंत सिमित आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या निर्देशांचे योग्य पालन करून प्रशासनाने चाचण्या केल्या आहेत. ३ फेब्रुवारी २०२० रोजी मुंबईत पहिली कोरोना चाचणी करण्यात आली. प्रारंभी ३ फेब्रुवारी ते ६ मे २०२० या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये मुंबईत १ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला होता. त्यानंतर पुढील २५ दिवसात १ लाख चाचण्या वाढून एकूण चाचण्यांची संख्या २ लाखांवर पोहोचली गेली.

त्यानंतर २४ जून २०२० रोजी ३ लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला. म्हणजे २ लाख ते ३ लाख हा टप्पा २३ दिवसांत गाठला गेला. तर दिनांक १४ जुलै २०२० रोजी ४ लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला. ३ लाख ते ४ लाख चाचण्या हा टप्पा २० दिवसांत पार पडला. २९ जुलैला ५ लाखांचा टप्पा पार करत ३ ऑगस्ट रोजी हा आकडा ५ लाख ५२ हजारांवर पोहोचला.
यातून निदर्शनास येते की, चाचण्यांचे हे लाखा-लाखांचे हे टप्पे गाठताना त्यातील दिवसांचे अंतर सातत्याने कमी होत आहे, याचाच अर्थ दैनंदिन सरासरी चाचण्यांचा वेग वाढला आहे, त्याची सरासरी वाढली आहे. विशेष म्हणजे २८ जुलै रोजी एकाच दिवसात तब्बल ११ हजार ६४३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एका दिवसांत करण्यात आलेल्या चाचण्‍यांचा हा उच्चांक आहे. त्यापूर्वी २७ जुलै २०२० रोजीच्या २४ तासांमध्ये ८ हजार ७७६ चाचण्या करण्यात आल्या होत्या. पूर्वीच्या दैनंदिन सरासरी चाचण्यांच्या तुलनेत हा वेग आता दुप्पटीपेक्षा अधिक दिसून येत आहे.

मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दर आता ०.९० टक्के इतका नोंदवला गेला असून १ टक्क्याच्याही खाली हा दर आल्याने मुंबईकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे. मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांचा विचार करता, एकूण १८ म्हणजे दोन तृतीयांश विभागांमध्ये १ टक्के किंवा त्यापेक्षा कमी रुग्णवाढ दर आहे. मुंबईत रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी देखील प्रथमच सत्तरीपार गेला आहे. हा सरासरी कालावधी आता ७८ दिवसांचा झाला आहे. आजपर्यंत मुंबईत १ लाख १७ हजार ४२१ रुग्ण आढळले, पैकी ९०हजार ०८९ रुग्ण बरे होऊन परतले आहेत. तर सध्या एकूण २०हजार ५४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

First Published on: August 4, 2020 8:26 PM
Exit mobile version