घाटकोपरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून दोन जण जखमी

घाटकोपरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून दोन जण जखमी

घाटकोपरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला (छाया-संदीप टक्के)

घाटकोपर (पूर्व) रमाबाई नगरातील दक्षता पोलीस वसाहतीतील सी २/२९ या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून दोन जण गंभीर जखमी झाले आहे. शिवाजी बाबाजी कुटे (वय ६५) लक्ष्मी शिवाजी कुटे (वय ६०) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना जवळील कोहिनूर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शिवाजी कुटे यांच्या मानेला तर लक्ष्मी कुटे यांच्या कमरेला जबर मार लागला आहे. अधिक माहिती अशी आहे की, ही घाटकोपरच्या रमाबाई नगरातील दक्षता पोलीस वसाहत ही खाजगी वसाहत असून २२ वर्ष जुनी आहे. पाच वर्षांपूर्वी येथील वसाहतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते.

आज सकाळी ७ वाजता ही घटना घडली. आम्ही सर्वजण बेडरूममध्ये झोपल्याने सुदैवाने मोठा प्रसंग टळला. आज सकाळी बाबा आणि आई दोघेजण पलंगावर बसले होते आणि त्यावेळेस स्लॅब कोसळला. बाबाच्या मानेला तर आईच्या कमरेला मार लागला आहे. इमारतीला २२ वर्ष झाली आहेत. ५ वर्षांपूर्वी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते. अनेक विकासक येथे आले होते. मात्र येथील रहिवाशांची मागण्यामुळे हा प्रोजेक्ट थांबून राहल्याने इमारतीची अवस्था खूपच खराब झाली आहे. खिळा जरी ठोकला तरी सिमेंट खाली पडते आहे. पावसाळ्यात तर काहीही घडू शकेल, अशी भीती आम्हाला झाली आहे.
– रमेश कुटे, रहिवासी

कुटे कुटुंबातील दोन जण गंभीर जखमी

मात्र, वसाहतीतील रहिवाशांच्या विविध मागण्यामुळे येथील पुनर्विकासाचे काम रखडून आहे. परिणामी इमारती जीर्ण झाल्या आहेत. सिमेंटचे ढेपळे रोज निखळत आहेत. भिंती वाळवणे पोखरल्याने इमारतीच्या लोखंडी ग्रीलदेखील खाली पडत आहेत. या इमारतीत राहणारे रहिवाशी कसाबसा जीव मुठीत धरून दिवस काढत आहेत. तर अन्य त्यावर स्वतः दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत. सी २/२६ या इमारतीतील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या भागवत शिवाजी गोरडे यांच्या घराच्या छताचे व भिंतीचे दुरुस्तीचे काम दोन दिवसापासून सुरु होते. मात्र छताच्या लोखंडी सळ्या जीर्ण झाल्या असल्याने आज सकाळी ७ वाजता स्लॅब कोसळून दुसऱ्या मजल्यावर राहणारे कुटे कुटुंबातील दोन जण गंभीर जखमी झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तर या वसाहतीतील सर्व इमारतींची अवस्था खूप वाईट आहे. त्यामुळे पावसाळ्यात मोठा प्रसंग घडेल, अशी भीती वसाहतीतील रहिवाशी व्यक्त करत आहेत.

First Published on: May 25, 2019 4:50 PM
Exit mobile version