मेडिकल कॉलेजला ऍडमिशन देण्याचे आमिष दाखवून २१ लाखांची फसवणूक

मेडिकल कॉलेजला ऍडमिशन देण्याचे आमिष दाखवून २१ लाखांची फसवणूक

नवी मुंबईच्या मेडिकल कॉलेज मध्ये ऍडमिशन करून प्रवेश देण्याचे आमिष दाखवून ५ जणांनी एका व्यावसायिकाची २१ लाखांची फसवणूक केली आहे. आरोपींमध्ये कॉलेजच्या ट्रस्टच्या सदस्याचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकारामुळे एक मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तेलंगाना राज्यात राहणारे गोपीकृष्ण भास्कर कोडे (५२) हे तेथील व्यावसायिक असून ते २०१६ मध्ये त्यांच्या मुलीच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्नशील होते.

असा घडला प्रकार

गोपीकृष्ण भास्कर कोडे यांना नवी मुंबई येथे राहणाऱ्या गौरीशंकर सिंग या इसमाने मोबाईलवर मेसेज पाठवला त्यात मुलीचे ऍडमिशन नवी मुंबईच्या तेरणा मेडिकल कॉलेजमध्ये होऊ शकते, असे सांगितले, त्यासाठी त्वरित संपर्क साधा असेही नमूद केले होते. हा मेसेज वाचून गोपीकृष्ण कोडे हे त्यांच्या अंबरनाथ (प) येथील न्यू बालाजी नगर परिसरात राहणाऱ्या नातेवाईकाच्या घरी मुलीसोबत आले होते. यावेळी आरोपी गौरीशंकर सिंग, प्रशांत कश्यप, कल्पेश पटेल, अशोक काळेकर सर्व राहणार नवी मुंबई यांनी कोडे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना नवी मुंबई येथे बोलावले. आरोपींनी नंतर कोडे यांची पंडित तुकाराम देशमुख या इसमाशी भेट करून दिली. देशमुख हे तेरणा कॉलेजमध्ये असलेल्या ट्रस्टचे सदस्य असल्याची माहिती त्यांना दिली. यामुळे आपल्या ऍडमिशनचे काम निश्चित होईल याची खात्री कोडे यांना झाली होती .

आरोपींनी कोडे यांच्याकडून मेडिकल कॉलेजच्या ऍडमिशनसाठी ३० लाख रुपयांची मागणी केली. कोडे यांनी हे पैसे दिल्यानंतर देखील त्यांच्या मुलीचे ऍडमिशन झाले नाही. त्यांनी आरोपींकडून त्यांचे पैसे परत मागितले त्यावेळी आरोपींनी केवळ ९ लाख रुपये परत दिली मात्र उर्वरित २१ लाख रुपये देण्यासाठी टाळाटाळ केली आणि गेल्या ३ वर्षांपासून विविध बँकेचे न वटणारे चेक दिले.

आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

या प्रकरणी कोडे यांनी आरोपींच्या विरुद्ध अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार केली असता आरोपी गौरीशंकर सिंग, प्रशांत कश्यप, कल्पेश पटेल, अशोक काळेकर आणि पंडित तुकाराम देशमुख यांच्या विरुद्ध तक्रार केली असता पोलिसांनी आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

‘या गुन्ह्यामध्ये अनेक पालकांची फसवणूक झाली असल्याची शक्यता आहे . आम्ही त्यादृष्टीने तपास करीत आहोत . त्यामुळे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.’ असे गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलीस निरीक्षक संजय बेंडे यांना सांगितले. आरोपी फरार असून आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. तसेच पालकांनी आपल्या पाल्याचे कुठेही ऍडमिशन घेतांना त्यांच्या मोबाईलवर येणाऱ्या मेसेजवर अवलंबून राहु नये. पैशांचा व्यवहार खात्रीपूर्वक करावा. अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बेंडे यांनी केले आहे.


Ayodhya Dispute : राम मंदिरावर सुनावणी अखेर संपली, पण निर्णय राखून ठेवला!
First Published on: October 16, 2019 7:45 PM
Exit mobile version