ठाण्यातील जिल्हा परिषदेच्या २३५ कर्मचार्‍यांना पदोन्नतीची लॉटरी

ठाण्यातील जिल्हा परिषदेच्या २३५ कर्मचार्‍यांना पदोन्नतीची लॉटरी

ठाण्याच्या ग्रामीण भागात लसीकरण मोहीमेस नागरिकांनी फिरवली पाठ, जिल्हा प्रशासनाकडून 'मिशन मोड'मध्ये मोहीम हाती

गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे-पालघर समायोजनामुळे अडकलेल्या कर्मचार्‍यांच्या पदोन्नत्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. ठाणे जिल्हा परिषदेतील तब्बल २३५ कर्मचार्‍यांना पदोन्नती देऊन नवीन वर्षाची भेट देण्यात आली आहे. ३१ डिसेंबर रोजी पदोन्नती समितीने हिरवा सिग्नल दिल्यानंतर काल, १ जानेवारी २०१९ रोजी पदोन्नती निकषानुसार या पदोन्नत्या देण्यात आल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) चंद्रकांत पवार यांनी दिली.

२०१४ साली पालघर जिल्हा स्वतंत्र झाल्यानंतर समायोजन प्रक्रिया राबवण्यात येत होती. कोकण विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही समायोजित प्रक्रिया व्यवस्थितपणे पूर्ण केल्यानंतर पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला होता. नवीन वर्षात कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्याकरता ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्या सुचनेनुसार सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी-कर्मचारी दिवसरात्र पदोन्नती प्रक्रियेचे कामकाज करत होते. २९ डिसेंबर २०१७ च्या मार्गदर्शक सुचनेनुसार हायकोर्टाच्या याचिका क्रमांक २७९७/२०१५ वर कोर्टाने दिलेल्या ४ ऑगस्ट २०१७ च्या निर्णयाच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्र. २८३०६ / २०१७ ही सध्या प्रलंबित आहे. ही बाब विचारात घेऊन शासनाच्या विधी व न्याय विभागाचे अभिप्रायानुसार व सामान्य प्रशासन विभागाने कळवल्यानुसार तूर्तास पदोन्नतीच्या कोट्यातील सेवाज्येष्ठतेनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या अधिन राहून या पदोन्नत्या करण्यात आल्या आहेत.

सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी ०५, कनिष्ठ प्रशासन अधिकारी १०, वरिष्ठ सहाय्यक १८ , कनिष्ठ सहाय्यक २०, वाहन चालक ०३, हवालदार १४ असे एकूण या विभागाच्या ७१ कर्मचार्‍यांना तसेच लेखा विभागाच्या सहाय्यक लेखाधिकारी ०३, कनिष्ठ लेखाधिकारी ०३, वरिष्ठ सहाय्यक लेखाधिकारी ०४, कनिष्ठ सहाय्यक लेखाधिकारी १० असे एकूण वीस कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यात आली. आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचार्‍यांना देखील पदोन्नती मिळाली असून यामध्ये आरोग्य सहाय्यक महिला ०६, आरोग्य पर्यवेक्षक ०३, पशुधन पर्यवेक्षक ०१, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी ०४ अशा पद्धतीने पदोन्नत्या देण्यात आल्या. आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागाच्या ज्या कर्मचार्‍यांची सेवा बारा आणि चौवीस वर्षे पूर्ण झाली आहे, अशा तब्बल १३० कर्मचार्‍यांना कालबद्ध पदोन्नती देण्यात आली आहे.

ठाणे-पालघर समायोजन करण्यात आम्हाला यश आले. हे समायोजन यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर तातडीने सामान्य प्रशासन विभागामार्फत पदोन्नती निकषात बसणार्‍या कर्मचार्‍यांना नवीन वर्षात अशा प्रकारे भेट दिली.
– विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांना पारदर्शीपणे पदोन्नती देण्यात आली आहे. निश्चितच नवीन वर्षाची ही अनोखी भेट त्यांच्यासाठी आनंददायी आहे. जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
– मंजुषा जाधव, अध्यक्ष, जिल्हा परिषद ठाणे

First Published on: January 3, 2019 4:17 AM
Exit mobile version