Mumbai Crime : क्षुल्लक कारणावरून मुंबईत तरुणाची हत्या, पाच जणांना अटक

Mumbai Crime : क्षुल्लक कारणावरून मुंबईत तरुणाची हत्या, पाच जणांना अटक

क्षुल्लक कारणावरून मुंबईत तरुणाची हत्या, पाच जणांना अटक

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण करण्यात येत आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतही गुन्हेगारींच्या घटनांमध्ये वाढ झाली असून क्षुल्लक कारणांवरून हत्येसारखे गुन्हे घडत आहेत. मुंबईतील मुलुंड परिसरात क्षुल्लक कारणावरून एका 30 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. अक्षय नार्वेकर असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. (Mumbai Crime young man was killed for a trivial reason)

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय नार्वेकर हा तरुण आणि त्याचा मित्र आकाश साबळे हे मुलुंड परिसरात असलेल्या आरोपी इम्रान याच्या चिकन सेंटरवर चिकन घेण्यासाठी गेले होते. परंतु, यावेळी पैशांच्या क्षुल्लक कारणावरून या अक्षय आणि इम्रानमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर तेथील लोकांच्या मध्यस्थीने तो सोडविण्यात आला. पण आरोपी इम्रान व त्याचा भाऊ सलीम याने अक्षय आणि आकाश या दोघांना पुन्हा चिकन सेंटरजवळ बोलावून त्यांच्यासोबत वाद घातला. यावेळी या दोघांवर इम्रान व त्याच्याभावासोबत आलेल्या साथीदारांनी प्राणघातक हल्ला केला. ज्यामध्ये अक्षय आणि आकाश जबर जखमी झाले.

हेही वाचा… Salman Khan Firing Case: सलमान खान गोळीबारप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी; चौघांना मोक्का

आरोपी इम्रान याने आपल्यासोबत त्याचा भाऊ सलीम महमूद खान, व मित्र फारुख गफार बागवान, नौशादअली गफार बागवान आणि अब्दुल गफार बागवान यांना बोलावून अक्षय नार्वेकर आणि आकाश साबळे यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला करून हे पाचही जण घटनास्थळावरून पळून गेले. या दोघांवर . चॉपर आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्यानंतर ते गंभीररीत्या जखमी झाले होते. परंतु, ही माहिती मिळताच मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या आकाश आणि अक्षय यांना जवळच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अक्षयला डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आले तर, गंभीर जखमी झालेल्या आकाशवर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी कट रचून हत्येसह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या पाचही आरोपींना मुलुंड आणि ठाण्यातून पोलिसांनी अटक केली. तपासात खान बंधूंनीच कट रचून ही हत्या घडवून आणल्याचे उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत पाचही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

हेही वाचा… Vasai News: १६ जणांविरोधात बलात्कारासह पोक्सोचा गुन्हा


Edited By : Poonam Khadtale

First Published on: April 29, 2024 10:48 PM
Exit mobile version