यंदा पावसाळ्यात पाणी साचण्याचं नो टेन्शन! २४१ नवीन पंप कार्यरत होणार

यंदा पावसाळ्यात पाणी साचण्याचं नो टेन्शन! २४१ नवीन पंप कार्यरत होणार

साचलेले पाणी

पावसाच्या पाण्याचा योग्य तऱ्हेने निचरा व्हावा यासाठी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याबरोबर मुंबई मेट्रो आणि एमएमआरडीएच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची गुरूवारी बैठक झाली. अनेक ठिकाणी मेट्रोचे काम सुरु असल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा कसा करता येईल याबाबत या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मेट्रोची कामं सुरु आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साठण्याची शक्यता असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी निर्दशनास आणून दिले होते. त्यामुळे यासंदर्भात मेट्रोचं काम चालू असणाऱ्या ठिकाणी पाण्याचा प्रभावीपणे निचरा करता यावा म्हणून २४१ पंप बसवण्यात येतील असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

४३६ पंप करणार पाणी निचऱ्याचं काम

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA), मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरसीएल या तिघांच्या झालेल्या पूर्व पावसाळी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पाणी साचण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणी मेट्रोकडून २४१ पंप बसवण्यात येणार असून आहेत. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात मुंबईत ठिकठिकाणी साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी एकूण ४३६ पंप कार्यरत असतील.

नोडल ऑफिसर करणार देखरेख

पावसाळ्यादरम्यान पालिकेसोबत योग्य समन्वय साधता येण्यासाठी या दोन्ही संस्था समन्वय अधिकाऱ्यांची (नोडल ऑफीसर) नेमणूक करण्याची घोषणा करण्यात आली. गेल्या वर्षी ज्या-ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास तुलनेने अधिक कालावधी लागला होता, त्या-त्या ठिकाणी पाण्याचा निचरा अधिक प्रभावीपणे व्हावा, यासाठी अधिक काळजी घेण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच या ठिकाणी आवश्यक आणि योग्य सोयीसुविधा पुरवण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी एमएमआरडीए आणि एमएमआरसीएल या संस्थांकडून देण्यात आली.

पंपाचे काम अंतिम टप्प्यात

मुंबई सेंट्रल, कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक येथील पर्जन्यजल वाहिन्या मेट्रो स्टेशनच्या कामांसाठी वळवण्यात येणार आहेत. हे काम आता अंतिम टप्प्यात असून ते ३१ मे पर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान रेल्वे, मेट्रो आणि शहरातील इतर विकासकामांमुळे पाणी साचण्याची शक्यता असलेली १७ ठिकाणं सध्या पालिकेने शोधून काढलेली आहेत. या ठिकाणांवर अधिक लक्ष केंद्रीत केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

First Published on: May 25, 2018 4:09 AM
Exit mobile version