चिंताजनक! ७ दिवसात २७९ पोलिसांना कोरोनाची लागण

चिंताजनक! ७ दिवसात २७९ पोलिसांना कोरोनाची लागण

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. राज्यासह मुंबईत वाढणाऱ्या कोरोनाबाधितांची साखळी तोडण्यासाठी मुंबई पोलीस दलातील पोलीस अहोरात्र मेहनत घेताना दिसत आहेत. मात्र, आता या कोरोनाचा फटका पोलीस दलाला देखील बसत आहे. मुंबई पोलीस दलातील एका पोलीस अधिकाऱ्यांचा सोमवारी कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच अवघ्या सात दिवसात मुंबई पोलीस दलातील २७९ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलीस दलाची चिंताही वाढली आहे.

गेल्या सात दिवसात मुंबईत २७९ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ११ एप्रिलपर्यंत मुंबईतील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या ७ हजार ९९७ होती. तर त्यापैकी ७ हजार ४४२ पोलिसांची कोरोनातून मुक्तता झाली आहे. तर सध्या ४५४ पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहेत.

राज्यासह मुंबईत कोरोना विषाणूचा फैलाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. या कोरोनाच्या संकटात अहोरात्र काम करणाऱ्या पोलीस दलातही कोरोनाचा धोका वाढत आहे. मुंबईत आतापर्यंत १०१ पोलिसांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

७० टक्के पोलिसांनी घेतली कोरोना लस

मुंबईतील ७० टक्के पोलिसांनी कोरोनाची लस घेतली आहे. तर ११ एप्रिलपर्यंत ३० हजार ७५६ पोलिसांना कोरोनाची लस घेतली. त्यात २ हजार ६९० पोलीस अधिकारी आणि २८ हजार ६६ पोलीस शिपायांचाय समावेश आगे. तर १७ हजार ३५१ पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यात १ हजार ३२५ पोलीस अधिकारी आणि १६ हजार २६ पोलीस शिपायांचा समावेश आहे.


हेही वाचा – चिंताजनक! मुंबईत आतापर्यंत १०१ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे बळी


 

First Published on: April 13, 2021 12:49 PM
Exit mobile version