मुंबई पोलीस दलातील ३०० ‘सुपरसेव्हर्स’ वाचवणार कोरोना रुग्णांचे प्राण

मुंबई पोलीस दलातील ३०० ‘सुपरसेव्हर्स’ वाचवणार कोरोना रुग्णांचे प्राण

प्रातिनिधिक फोटो

कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी मुंबई पोलीस दलात ३०० सुपर सेव्हर्स तयार करण्यात येणार असून या सुपर सेव्हर्सना केंद्राच्या ‘राष्ट्रीय जन स्वास्थ प्रशिक्षण आणि अनुसंधान संस्थे’कडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पोलिसातील हे सुपर सेव्हर्स आरोग्य सेवा केंद्राच्या मदतीसाठी २४ तास तत्पर असतील. कुठल्याही रुग्णाला कधीही आणि कुठलीही मदत करण्यासाठी हे मानवदूत काम करतील. पोलिसांमधील आक्रमक गुणांना मानवतेची जोड देऊन असे दूत मदतीसाठी तयार केल्यास गरजू कोरोना रुग्णांना तात्काळ मदत मिळून त्यांचे प्राण वाचतील, हा या योजनेमागचा मुख्य उद्देश असेल. मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यातून दोन सुपर सेव्हर्सची निवड करण्यात येणार आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असून दररोज हजारोच्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. यापैकी बहुसंख्य रुग्णांना वेळेवर बेड, ऑक्सिजन तसेच औषधे उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकांचा काही तासांतच मृत्यू होतआहे. आरोग्य सेवा केंद्रांना कोरोना रुग्णांपर्यंत जाऊन त्यांना तातडीची वैद्यकीय सेवा देण्यासाठी वेळेवर पोहोचता येत नाही, अशी स्थिती आहे. या आजारात थोडा जरी वेळ गेला तर रुग्णांचे प्राण वाचणे कठीण होत आहे. म्हणूनच या आरोग्य सेवा पुरवठा केंद्राला मदत करण्यासाठी मुंबईसह राज्यातील पोलीस दलात ‘सुपर सेव्हर्स’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे लक्षात घेऊन राज्यासह मुंबई पोलीस दलातील प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन सुपर सेव्हर्स असतील. त्यासाठी शासनाकडून प्रत्येक पोलीस ठाण्यातून एका अधिकारी आणि एका पोलीस अंमलदार याची निवड करण्यात येणार आहे. या ‘सुपर सेव्हर्स’ची माहिती तात्काळ मागवण्यात आली असून ही नावे केंद्राच्या ‘राष्ट्रीय जन स्वास्थ प्रशिक्षण आणि अनुसंधान संस्थेकडे पाठवली जाणार आहे. ही संस्था पोलीस दलात ‘सुपर सेव्हर्स’ तयार करून राज्यभर त्यांना आरोग्य सेवेसाठी तयार करणार आहे.

आरोग्य केंद्रांना मिळणार मदतीचा हात

एकट्या मुंबई पोलीस दलात ३०० ‘सुपर सेव्हर्स’ असतील. प्रत्येक पोलीस ठाण्यात २ सुपर सेव्हर्स आरोग्य सेवा केंद्रांच्या संपर्कात असतील. या केंद्रांकडून पोलिसांना बदलत्या कोरोनाच्या संक्रमणाबाबत माहिती देऊन त्यांना कोरोना रुग्ण हाताळणे, आरोग्य सेवेला मदत करणे, घरी विलगीकरणात असणार्‍यांची माहिती आरोग्य सेवेला देणे, लसीकरण संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करणे अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या ‘सुपर सेव्हर्स’चा फायदा नागरिक, कोरोना रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि आरोग्य सेवा पुरवणार्‍या केंद्रांना होणार असून या ‘सुपर सेव्हर्स’मुळे कोरोनामुळे होणारे मृत्यू टाळता येतील. तसेच रुग्णांना कोरोनावर मात करता येईल, अशी माहिती मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

 

First Published on: May 11, 2021 9:49 AM
Exit mobile version