पावसाळ्यापूर्वी ३,५०० किलोमीटर लांबीच्या पर्जन्य जलवाहिन्यांची होणार सफाई

पावसाळ्यापूर्वी ३,५०० किलोमीटर लांबीच्या पर्जन्य जलवाहिन्यांची होणार सफाई

मुंबई : पावसाळा तोंडावर आल्याने मुंबई महापालिकेने नालेसफाई, पर्जन्य जलवाहिन्यांची सफाई कामे सुरू केली आहे. मुंबईत ३,५०० किलोमीटर लांबीच्या पर्जन्य जलवाहिन्या आहेत. यामध्ये, ब्रिटिशकालीन १०० वर्षांहून अधिक जुन्या ५८ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांचा समावेश आहे. शहर विभागात म्हणजे ए ते जी/उत्तर विभागांच्या हद्दीत मिळून ९८ किलोमीटर लांब अंतराच्या भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांची ‘सुव्यवस्थित स्वच्छता’ केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील ६३ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांची ‘सुव्यवस्थित स्वच्छता’ यशस्वीपणे करण्यात आली आहे. आता हा दुसरा टप्प्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. (3500 km long rain water channels will be cleaned before monsoon)

मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्यांचे परिरक्षण व दुरुस्तीविषयक कामे पर्जन्य जलवाहिन्या प्रचालने व परिरक्षण उपविभागामार्फत करण्यात येते. संपूर्ण मुंबईत ३ हजार ५०० किलोमीटर लांबीचे पर्जन्य जलवाहिन्या जाळे आहे. यामध्ये लहान-मोठ्या वाहिन्या, रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱया वाहिन्या, खुल्या व बंदिस्त, भूमिगत अशा सर्व प्रकारच्या आणि कमानी (आर्च), बॉक्स (कपाट), पाईप (गोल) अशा वेगवेगळ्या आकाराच्या वाहिन्यादेखील आहेत. त्यासोबत यातील काही वाहिन्या या ब्रिटिशकालीन अशा १०० वर्षांहून अधिक जुन्या असून त्या प्रामुख्याने शहर विभागात आहेत. स्वाभाविकच, या वेगवेगळ्या प्रकाराच्या पर्जन्य जलवाहिन्यांची देखभाल, दुरुस्ती ही तितकीच वैविध्यपूर्ण पद्धतीने करावी लागते आणि ती आव्हानात्मक देखील ठरते.

पर्जन्य जलवाहिन्यांच्या स्वच्छतेचे आव्हान

पावसाळी पाण्याचा त्वरेने निचरा होण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांची नियमितपणे स्वच्छता व दुरुस्ती करावी लागते. बंदिस्त व भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये शिरण्याची जागा अर्थात मनुष्य प्रवेशिका (मॅनहोल) व त्याच्या दोन्ही बाजूस एक मीटर अंतरापर्यंत महापालिकेकडून नियमित देखभाल (परिरक्षण), दुरुस्ती व स्वच्छता नियमितपणे केली जाते. दोन मॅनहोल मधील अंतर सुमारे ३० मीटर इतके असते आणि इतके अंतर निव्वळ मनुष्यबळाच्या सहाय्याने परिरक्षित करणे शक्य होत नाही. कारण अशा वाहिन्यांच्या आतमध्ये अंधार, विषारी स्वरुपाचे वायू, प्राणवायूचा अभाव, साचलेला कोरडा गाळ असे वेगवेगळे धोके असतात.

या सर्व आव्हानांना पार करु शकेल, इतकी आधुनिक यंत्रणा व तज्ज्ञ, कुशल मनुष्यबळ महापालिकेकडे उपलब्ध नसते. महापालिकेकडून सक्शन व जेटिंग पद्धतीने लहान आकाराच्या वाहिन्या स्वच्छ केल्या जातात. मात्र मोठ्या आकाराच्या व आव्हानात्मक असणाऱया पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये सक्शन व जेटिंग परिणामकारक ठरत नाही. परिणामी गाळ साचून पर्यायाने वहन क्षमता कमी होवू शकते. त्यामुळे अशा मोठ्या वाहिन्यांची देखभाल, दुरुस्ती विशेष कामांच्या स्वरुपात करावी लागते. त्यासाठी ‘सुव्यवस्थित स्वच्छता’ पद्धतीचा अवलंब केला जातो.

अशी असते ‘सुव्यवस्थित स्वच्छता’

सुव्यवस्थित स्वच्छता करताना बंदिस्त व भूमिगत वाहिन्यांमधील गाळ, कचरा हा पाईपच्या सहाय्याने शोषून बाहेर काढला जातो, त्याचवेळी पाण्याचा मारा करुन वाहिन्यांची स्वच्छता देखील होते. वाहिन्यांमधील विषारी वायू संयंत्रांच्या सहाय्याने बाहेर काढले जातात. त्यानंतर स्वच्छ झालेल्या वाहिन्यांचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने निरीक्षण केले जाते. आवश्यक असल्यास, आवश्यक त्या जागी योग्य दुरुस्ती व देखभालीची कामे केली जातात. सुव्यवस्थित स्वच्छतेनंतर या वाहिन्यांची प्रवाह क्षमता पूर्ववत होण्यास मदत होते, त्यातून पावसाच्या पाण्याचा निचरा वेगाने होतो.

शहर विभागातील सुव्यवस्थित स्वच्छतेचा पहिला टप्पा यशस्वी

मुंबईतील एकूण पर्जन्य जलवाहिन्यांपैकी, शहर विभागात सुमारे ५८२ किलोमीटर लांब अंतराचे पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे आहे. यामध्ये सध्या ब्रिटिशकालीन अशा १०० वर्षांहून अधिक जुन्या कालावधीच्या ५८ किलोमीटर अंतराच्या वाहिन्या आहेत. ब्रिटिशकालीन व त्यानंतरच्या अशा दोन्ही कालावधीतील मिळून सुमारे ६३ किलोमीटर लांबीच्या भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांची सुव्यवस्थित स्वच्छता महापालिकेने यापूर्वी केली आणि ती यशस्वी देखील ठरली.

आता महापालिकेने शहर विभागात दुसऱ्या टप्प्यात सुमारे ९८ किलोमीटर अंतराच्या भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांची सुव्यवस्थित स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची प्रक्रिया पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या प्रचालने व परीरक्षण उपविभागाने सुरु केली आहे.


हेही वाचा – “क्रांतीचे नाव राहुल गांधी” तुरुंगातून सुटल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धूंनी केले वक्तव्य

First Published on: April 1, 2023 8:36 PM
Exit mobile version