लोकसहभागातून 5 हजार वनराई बंधारे

लोकसहभागातून 5 हजार वनराई बंधारे

जिल्ह्यातील आदिवासी, ग्रामीण क्षेत्रात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या संकल्पनेतून तब्बल 5 हजार वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत बुधवार 2 ऑक्टोबरपासून वनराई बंधार्‍याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

या वनराई बंधार्‍याच्या पाण्यावर विविध भाजीपाला लागवड, कडधान्य, तसेच रब्बी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणत करणे शक्य होणार आहे. तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनदेखिल पाणी जमिनीमध्ये जिरण्या ऐवजी वाहून जाते. त्यामुळे सरासरी इतका पाऊस होऊनही भूजल पातळीत घट झालेली पाहायला मिळते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन वनराई बंधारे बांधणे महत्त्वाचे ठरणार आहे. जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, मुरबाड, शहापूर या पाच ग्रामीण तालुक्यात बंधारे बांधले जाणार आहेत. या लक्षांकानुसार पाचही तालुक्यात 5 हजार वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. यामध्ये शहापूर आणि मुरबाड तालुक्यांना 1500, भिवंडी 1000, आणि कल्याण व अंबरनाथ तालुक्यांना प्रत्येकी 500 असे लक्षांक देण्यात आले आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना हा विभाग कार्यरत असतो. या विभागाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबिवले जातात. या विभागाच्या माध्यमातूनही नोव्हेंबर -डिसेंबर कालावधीत वनराई बंधारा बांधण्यात येणार आहे.

वनराई बंधारे बांधल्यामुळे टंचाईवर मात
वनराई बंधारे बांधल्यामुळे पाणी जमिनीत जिरून भूगार्भातील पाण्याची वर येण्यास मदत होईल. भाजीपाला, कडधान्य तसेच रब्बी पिकाच्या लागवड मोठ्या प्रमाणात करता येईल. पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त दैनंदिन वापरासाठी या पाण्याचा वापर करता येईल. तसेच शेतीसाठी उपयोगी असलेल्या जनावरांनाही वनराई बंधार्‍यामुळे पाणी उपलब्ध होईल. जंगलातील पशुपक्षी यांच्यासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. त्याचबरोबर टंचाई कमी होऊन उन्हाळ्यात पाण्याचे टँकर कमी होतील.

First Published on: October 2, 2019 2:07 AM
Exit mobile version