ताज हॉटेल पदपथाचे ८ कोटी ८५ लाख रुपयाचे शुल्क माफ – पालिकेचा निर्णय

ताज हॉटेल पदपथाचे ८ कोटी ८५ लाख रुपयाचे शुल्क माफ – पालिकेचा निर्णय

दहशतवादी हल्ल्यानंतर ताज हॉटेलने गेटवे ऑफ इंडिया समोरील रस्ता व पदपथ सुरक्षेच्या कारणास्तव पादचाऱ्यांसाठी बंद केला आहे. यासाठी वसूल करण्यात येणारे ८ कोटी ८५ लाख रुपयांचे शुल्क महापालिकेने माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे व्यापलेल्या रस्त्याच्या शुल्कातही ५० टक्के सूट देण्यात येणार आहे. स्वतःची आर्थिक परिस्थिती कमकुवत असताना पालिकेने घेतलेल्या या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

गेटवे ऑफ इंडिया समोरील हॉटेल ताज पॅलेसवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी अतिरेकी हल्ला झाला. यात ३१ जणांचा मृत्यू झाला होता. तब्बल तीन दिवसाच्या प्रयत्नानंतर भारतीय कमांडोंनी अतिरेक्यांचा खातमा केला. या घटनेनंतर ताज परिसरातील पदपथ व पे अँड पार्किंगचा भाग सुरक्षेच्या कारणास्तव पूर्णपणे सील करण्यात आला. या घटनेला बारा वर्षे उलटूनही हा भाग अद्यापही सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद आहे. हॉटेल व्यवस्थापनाने पी. जे. रामचंदानी मार्ग, बेस्ट मार्ग, बी. के. बोमन बेहराम मार्ग, महाकवी भूषण मार्ग आधी रस्त्याच्या पदपथावर मोठ्या कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पालिकेचे ८६९ चौरस मीटर क्षेत्रफळ व्यापले आहे. तसेच ११३६ चौरस मीटर पदपथ नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे. २०१५ मध्ये तत्कालीन पालिका आयुक्तांनी व्यापलेल्या जागेची धोरणानुसार शुल्क वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार हॉटेल व्यवस्थापकांशी पत्र व्यवहार केला असता, व्यवस्थापनाने या शुल्कामध्ये सुट देण्यात यावी, अशी विनंती केली.

पालिकेने ताजकडून २००९ ते २०२० पर्यंत ८ कोटी ८५ लाख ६३ हजार रुपये हे शुल्क वसूल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रशासनाने सुरक्षितेचे कारण पुढे करत, व्यापलेल्या पदपथाचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ८ कोटी ८५ लाख रुपयावर पाणी सोडावे लागणार आहे. व्यापलेल्या रस्त्याचेही ५० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. २००९ ते २०२० पर्यंत व्यापलेल्या रस्त्याच्या शुल्कात ५० टक्के सूट देण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत ६६ लाख ५२ हजार रुपये जमा होणार आहेत. तर यापुढे पालिकेला दर महिना अवघे ५१ हजार ९७५ रुपये इतके शुल्क मिळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

पालिकेच्या या निर्णयाला विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी जोरदार विरोध केला आहे. मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांनी पदपथ व्यापले तर त्यांच्याकडून दंडासह शुल्क वसूल करणाऱ्या पालिकेने ताज हॉटेलसाठी मात्र करोडो रुपयांच्या महसुलावर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस पक्ष हे होऊ देणार नाही. यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल, असा इशाराही राजा यांनी दिला. त्यामुळे या माफी प्रकरणावरून बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत वादळी चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


हेही वाचा – कोरोनाला न जुमानता कोस्टल रोडचे काम सुसाट

First Published on: December 7, 2020 8:24 PM
Exit mobile version