केडीएमसीत सोडतीद्वारे ९१३ फेरीवाल्यांना जागेचे वाटप

केडीएमसीत सोडतीद्वारे ९१३ फेरीवाल्यांना जागेचे वाटप

केडीएमसीत सोडतीद्वारे ९१३ फेरीवाल्यांना जागेचे वाटप

कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर फेरीवाल्यांचा प्रश्न चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. लोकप्रतिनिधींकडूनही प्रशासनावर आगपाखड करण्यात आली होती. त्यामुळे बुधवारी कल्याण डोंबिवली महापालिकेने सोडतीद्वारे फेरीवाल्यांच्या जागेचे वाटप केले. पहिल्या टप्प्यात फ प्रभागातील ५०३ आणि ग प्रभागातील ४१० नगरपथ विक्रेत (फेरीवाले) यांना सोडतीद्वारे जागेचे वाटप करण्यात आले आहे. प महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्या दालनात शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली आहे. पालिकेतील अन्य आठ प्रभागातील जागांची सोडत पुढील दोन महिन्यात काढण्यात येईल, असे महापालिका आयुक्त बोडके यांनी स्पष्ट केले.

पालिकेला आली जाग

स्टेशन परिसरात १५० मीटर अंतर आणि शाळेपासून १०० मीटरच्या अंतर फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा मनाई आदेश आहे. हा आदेश धुडकावून फेरीवाले स्टेशन परिसरातील पदपथ, स्कायवॉक, पादचारी पूलावर सर्रासपणे व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी अनेकवेळा महापालिका प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या होत्या. मात्र, पालिका प्रशासनाकडून फेरीवाल्यांच्या कारवाईकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही केला जात होता. दरम्यान, या काळात डोंबिवलीत फेरीवाल्यांमध्ये व्यवसायाच्या जागेवरुन हाणामारी झाल्याची घटना घडल्याने पालिका प्रशासनावर टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे महापालिकेला फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केल्यानुसार जागा वाटपाचा निर्णय तातडीने घ्यावा लागला आहे. महापालिकेच्या हद्दीत दहा प्रभाग आहे. प्रत्येक प्रभागातील लोकसंख्येच्या तुलनेत २.५ टक्के जागा फेरीवाल्यांकरीता व्यवसायासाठी पट्टे मारुन दिली जाणार आहे.

९ हजार ५३१ फेरीवाले

महापालिकेने २०१४ मध्ये महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली शहर फेरीवाला समिती गठीत केली हेाती. या समितीच्या निर्णयानुसार २०१४ साली महापालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार एकूण ९ हजार ५३१ फेरीवाले आढळून आले होते. २०१४ च्या सर्वेक्षणानंतर मार्च २०१८ मध्ये सर्वेक्षातील फेरीवाल्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती. त्यानुसार पात्र ठरलेल्या फेरीवाल्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या १ नोव्हेंबर २०१७ च्या निर्देशानुसार दिलेल्या निकषांन्वये १ १ मीटर जागा देण्याची प्रक्रिया करणे शिल्लक होती. त्यानुसार बुधवारी पहिल्या टप्प्यात फ प्रभागातील ५०३ आणि ग प्रभागातील ४१० नगरपथ विक्रेत (फेरीवाले) यांना सोडतीद्वारे जागेचे वाटप करण्यात आले आहे. याप्रसंगी उपायुक्त सुनील जोशी, सहाययक आयुक्त सुहास गुप्ते, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, उपअभियंता शैलेश मळेकर फेरीवाला विक्रेता संघटनेचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.


हेही वाचा – डोंबिवलीत ओळखीच्या तरूणानेच केली ‘ति’ची हत्या, अतिप्रसंग ठरला कारण!


 

First Published on: November 13, 2019 8:54 PM
Exit mobile version