देवेंद्र फडणवीसजी, बांगड्यांच्या वक्तव्यावर माफी मागा – आदित्य ठाकरे

देवेंद्र फडणवीसजी, बांगड्यांच्या वक्तव्यावर माफी मागा – आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस

राज्याच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून विद्यमान महाविकासआघाडी सरकारचं हे पहिलंच पूर्णवेळ अधिवेशन आहे. या अधिवेशनामध्ये सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांकडून जंगजंग पछाडलं जात आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी निदर्शनं, घोषणाबाजी आणि सभागृहातील प्रश्नोत्तरं या माध्यमातून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, आक्रमक भूमिका घेताना या नेत्यांकडू केली जाणारी वक्तव्य वादात सापडत आहेत. भाजपतर्फे मंगळवारी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्यभर निषेघ मोर्चे काढले. यावेळी आझाद मैदानात देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी परखड टीका करत माफीची मागणी केली आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

आझाद मैदानात भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेऊन सरकारवर टीका केली होती. ‘१५ कोटी १०० कोटींवर भारी पडतील, स्वातंत्र्य मिळत नसेल तर ते हिसकावून घ्यावं लागेल’, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने बांगड्या घातल्या असतील, पण आम्ही घातलेल्या नाहीत. जर कुणी काही म्हटलं, तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. भाजपकडे तेवढी ताकद आहे’, असं फडणवीस म्हणाले होते.

आदित्य म्हणतात, मी कधी उलट बोलत नाही, पण…

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याचा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीटर अकाऊंटवर ट्वीट करून समाचार घेतला आहे. ‘श्री देवेंद्र फडणवीसजी, सामान्यपणे मी उलट उत्तर देणं टाळतो. पण कृपया तुम्ही बांगड्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावर माफी मागा. इथल्या सामर्थ्यशाली महिला बांगड्या घालतात. राजकारण तर चालतच राहणार आहे. पण हा दृष्टीकोण आपण बदलायला हवा. माजी मुख्यमंत्र्यांकडून अशा प्रकारचं अपमानजनक वक्तव्य येणं चुकीचं आहे’, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

First Published on: February 26, 2020 11:22 AM
Exit mobile version