अभिजित सामंत यांचा स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा

अभिजित सामंत यांचा स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा

मुंबई महापालिकेत भाजपच्या गटनेते पदासाठी दावेदार समजले जाणारे अभिजीत सामंत यांचा पत्ता आता पक्षाने कापण्यास सुरुवात केली आहे. सामंत हे सध्या स्थायी समिती आणि सुधार समितीचे सदस्य आहे. परंतु त्यांचा स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाने तातडीने घेतला आहे. स्थायी समितीसोबतच सामंत यांचा विधी समिती सदस्यत्वाचा राजीनामा घेतला आहे. त्यामुळे सामंत यांच्या स्थायी समिती सदस्यत्वाच्या राजीनाम्यामागील कारण काय, असा प्रश्न आता राजकीय धुरिणाना पडला आहे.

कोटक पालिकेत सक्रिय झाल्याचा परिणाम 

मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते मनोज कोटक हे खासदार झाल्यानंतर त्यांच्या जागी गटनेते म्हणून सामंत यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. त्यांच्यासोबत गटनेते पदासाठी ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे, माजी आमदार अतुल शहा, प्रकाश गंगाधरे आदींची नावे चर्चेत होती. परंतु नवीन मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी गटनेते न बदलता कोटक यांनाच कायम ठेवले. मात्र, खासदार झाल्यापासून कोटक यांचे महापालिकेतून मन उडाले असून त्यांना दिल्लीच्या वाऱ्यांमधून महापालिकेत लक्ष घालण्यास सवड मिळत नाही. मात्र, मागील आठवड्यापासून त्यांनी पुन्हा महापालिकेकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार सामंत यांना स्थायी आणि विधी समिती सदस्यत्वचा राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यामुळेच त्यांनी दोन्ही समिती सदस्यत्वाचा राजीनामा कोटक यांच्याकडे सादर केला. कोटक यांच्यानंतर स्थायी समितीत प्रत्येक विषयांची चिरफाड करण्याची क्षमता सामंत यांच्याकडे आहे. त्यांनी स्थायी समितीत अनेकदा भाजपच्या पहारेकऱ्याची भूमिका समर्थपणे पार पाडली होती. परंतु कोटक पुन्हा महापालिकेत सक्रिय झाल्याने त्यांचा राजीनामा मागण्यात आल्याचे बोलले जाते.

सामंत पाठोपाठ ज्योती आळवणी यांचाही राजीनामा?

अभिजित सामंत यांच्या रिक्त जागी दक्षिण मुंबईतील भाजपाच्या एका नगरसेवकांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच सामंत पाठोपाठ ज्योती आळवणी यांचा सुधार समिती सदस्यत्वाचा राजीनामा मागून घेतला जाण्याची शक्यता आहे. आळवणी या सुधार समिती सदस्य होत्या, त्यानंतर त्यांची वर्णी स्थायी समिती सदस्यपदी लावली. त्यामुळे सामंत यांच्याप्रमाणे आळवणी यांचाही राजीनामा मागितला जाण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा –

ओळखपत्र दाखवूनच करता येणार रक्तदान

लोकलमध्ये आधुनिक पेहरावावरून महिला पत्रकाराला धमकी!

First Published on: August 29, 2019 4:41 PM
Exit mobile version