राहुल कनाल हाजीर हो !

राहुल कनाल हाजीर हो !

राहुल कनाल

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती नामनिर्देशित सदस्य म्हणून टीम युवा सेनेमधील दोन सदस्यांना स्थान देण्यात आले आहे. मात्र यातील एका सदस्यांचे सदस्यत्व येत्या काळात अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राहुल कनाल असे या सदस्याचे नाव असून टीम युवा सेनेेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांमध्ये एक सदस्य म्हणून राहुल कनाल मानले जातात.

मात्र कनाल हे गेल्या काही महिन्यांपासून शिक्षण समितीच्या बैठकीसाठी फिरकलेच नसल्याचे वृत्त समोर आले असून त्यामुळे युवा सेनेला त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांच्या या गैरहजेरीमुळे शिक्षण समितीतील युवा सेनेच्या हातातील एक पद रिक्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.विशेष म्हणजे, कनाल यांनी गेल्या आठ महिन्यांपासून सभेला हजेरी न लावल्याने आता मुंबई महानगरपालिकेतर्फे ताकीद देखील देण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीत शिक्षकांसह अनेक नामनिर्देशित सदस्यांना स्थान देण्यात येते. त्यानुसार यंदा शिवसेनेकडून या शिक्षण समितीच्या नामनिर्देशित सदस्यांसाठी युवा सेनेच्या वाट्याला देण्यात आले होते. त्यानुसार गेल्या टर्ममध्ये युवा सेनेकडून साईनाथ दुर्गे आणि राहुल कनाल यांना स्थान देण्यात आले आहे. मात्र या सदस्यांपैकी एका सदस्याची उपस्थिती वादाच्या भोवर्‍यात अडकल्याने अनेकांकडून टीकेची झोड उठविली जात आहे.

…तर सदस्यत्व धोक्यात

शिक्षण समितीच्या नियमानुसार मुंबई महानगरपालिकेच्या अधिनियम १९८८ च्या कलम ५० (२) (क) अन्वये जर कोणताही व्यक्ती शिक्षण समितीची सदस्य म्हणून नेमणूक झाल्यावर कोणत्याही कारणांमुळे लागोपाठ आठ महिन्यांच्या काळात समितीच्या सभांना अनुपस्थित अथवा उपस्थित राहण्यास असमर्थ राहिला असेल तर त्यांचे समितीचचे सदस्यत्त्व बंद होईल अथवा त्याचे अधिकार पद रिकामे होईल, असा नियम आहे. या नियमानुसार राहुल कनाल यांना मुंबई महानगरपालिकेतर्फे नोटीस पाठविण्यात आलेली असून त्यांनी येत्या मंगळवारी होणारी शिक्षण समितीच्या बैठकीस राहण्यास अनिवार्य करण्यात आले आहे. या बैठकीत कनाल हे उपस्थित राहिले नाही, तर त्यांचे सदस्यत्त्व धोक्यात येणार असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

First Published on: October 15, 2019 5:52 AM
Exit mobile version