जैश-ए-मोहम्मदवर कठोर कारवाई व्हावी – अभाविप

जैश-ए-मोहम्मदवर कठोर कारवाई व्हावी – अभाविप

प्रातिनिधक फोटो

गुरुवारी, दि. १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सी.आर.पी.एफ.च्या ४२ जवानांना नाहक आपले प्राण गमवावे लागले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जम्मू कश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या या भ्याड हल्ल्याबाबत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. जैश-ए-मोहम्मद या संघटनेवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज अभाविपने विविध ठिकाणी आंदोलने केली. हुतात्मा जवानांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

ठिकठिकाणी केला विरोध

गुरुवारी झालेल्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये. या हानीला जबाबदार असणारी दहशतवादी संघटन जैश -ए- मोहम्मद विरोधात त्वरित कारवाई केली पाहिजे. या भावनेतून विविध महाविद्यालयांत तसेच सार्वजनिक स्थळी आज अभाविपने आंदोलन केले होते. अभाविप कार्यकर्ते, अन्य विद्यार्थी तसेच उपस्थित जनतेनेही हल्ल्याच्या या घटनेचा तीव्र निषेध केला. अभाविपद्वारे चर्चगेट स्टेशन, एम. डी. महाविद्यालय(परळ), जयहिंद सिनेमा (लालबाग), ठाकूर महाविद्यालय (कांदिवली), विवेकानंद महाविद्यालय (चेंबूर), सांताक्रूझ स्थानक, दादर स्थानक, वसई, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पनवेल,चिपळूण, गोगटे जोगळेकर महाविद्यालय(रत्नागिरी), सिंधुदुर्ग येथे घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला तसेच हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. देशभरातल्या विद्यार्थ्यांमध्ये अतिरेक्यांबद्दल तीव्र असंतोष असून सरकारने या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले पाहिजे अशी मागणी यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी केली.

First Published on: February 15, 2019 7:45 PM
Exit mobile version