गणेश भक्तांनो सावधान! सजावटीसाठी थर्माकोल वापरल्यास कारवाई होणार

गणेश भक्तांनो सावधान! सजावटीसाठी थर्माकोल वापरल्यास कारवाई होणार

सजावटीसाठी थर्माकोल वापरल्यास कारवाई होणार

राज्य सरकारने प्लास्टीक व थर्माकोल उत्पादन वापर विक्री आणि साठवणुकीवर बंदी घातली आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव काळात प्लास्टीक व थर्माकोलचा वापर करून नये. तसेच पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे. थर्माकोलचा वापर केल्यास ५ हजार ते २५ हजार रूपये दंड अथवा तीन महिने कारावासाची शिक्षा भेागावी लागेल, असा इशारा पालिकेने दिला आहे. प्लास्टीक व थर्माकोल बंदीची काटेकोर अंमलबजावणी करून ठाणे शहर स्वच्छ राखण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहनसुद्धा पालिकेकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा – परवडणाऱ्या घरांचा कर दर १ टक्क्यांवर आल्याने घरे स्वस्त – सुधीर मुनगंटीवार

ठाणे शहर स्वच्छ राखण्याकरिता सहकार्य करावे

प्लास्टीक व थर्माकोल अविघटनशील आहे. त्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्लास्टीक व थर्माकोल वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक करणाऱ्या संस्था, आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे गणेशोत्सवात सजावटीच्यावेळी थर्माकोलचा वापर करू नये. तसेच थर्माकोलपासून बनविण्यात येणारी ताटे, वाट्या, कप, ग्लास यांच्या वापराचे प्रमाणही जास्त आहे. या सर्व वस्तू विघटन न होणाऱ्या असून पर्यावरणास हानीकारक आहेत. या वस्तूंची विक्री आणि वापर दोन्ही बेकायदा असून त्याचा वापर करताना पहिल्यांदा आढळल्यास ५ हजार रूपये दंड, दुसऱ्यांदा आढळल्यास रु. १० हजार दंड आणि तिसऱ्यांदा आढळल्यास रु. २५ हजार दंड व तीन महिने कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. पर्यावरणस्नेही उत्सव साजरे करुन सजावटीकरिता जास्तीत जास्त पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करावा. प्लास्टीक व थर्माकोल बंदीची काटेकोर अंमलबजावणी करून ठाणे शहर स्वच्छ राखण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

First Published on: August 28, 2019 6:35 PM
Exit mobile version