केतकी चितळेला न्यायालयीन कोठडी

केतकी चितळेला न्यायालयीन कोठडी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिच्या जामीन अर्जावर तपास अधिकारी आणि सरकारी वकील यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर ठाणे सत्र न्यायालयाने बुधवारी तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानुसार केतकीची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकीला ठाणे पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयापुढे हजर केल्यावर पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या कोठडीची मुदत बुधवारी संपल्याने तिला ठाणे सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. केतकीची चौकशी पूर्ण झाली असून तिच्याकडून हस्तगत करण्यासारखे काहीच नसल्याने तिला न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ठाणे पोलिसांनी पोलीस कोठडी दरम्यान केतकीचे दोन मोबाईल व एक लॅपटॉप हस्तगत केला. लॅपटॉप, मोबाईलमधील डेटा व संबंधित फेसबुक पोस्टची माहिती ठाणे सायबर सेलचे पथक घेत आहेत. दरम्यान, यावेळी मुंबई पोलीस देखील तिचा ताबा घेण्यासाठी ठाणे न्यायायालत दाखल झाले होते. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केतकीचा पुढील ताबा गोरेगाव पोलिसांकडे देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले, तर मुंबईनंतर पुण्याच्या देहूरोड पोलिसांनी देखील ठाणे न्यायालयात तिचा ताबा मिळावा यासाठी अर्ज दाखल केला आहे.

त्यातच केतकीने ठाण्यातील गुन्ह्याप्रकरणी जामीन मिळावा, यासाठी वकिलामार्फत ठाणे न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर न्यायालयाने तपास अधिकारी आणि सरकारी वकील यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर निर्णय घेण्यात येईल असे म्हटले. दरम्यान, मुंबईतील गोरेगाव पोलीस देखील तिचा ताबा घेण्यासाठी ठाण्यात आले होते, मात्र जे.जे. रुग्णालयातून वैद्यकीय तपासणी करून आणताना तिला उशीर झाल्यामुळे गोरेगाव पोलिसांना परत जावे लागले आहे. आता त्यांना गुरुवारी किंवा शुक्रवारी तिचा ताबा मिळेल.

First Published on: May 19, 2022 5:00 AM
Exit mobile version