लोकांची गर्दी टाळण्यासाठी मुंबईत अतिरिक्त भाजी विक्री केंद्रे

लोकांची गर्दी टाळण्यासाठी मुंबईत अतिरिक्त भाजी विक्री केंद्रे

मुंबई महानगरपालिका

‘कोरोना कोविड १९’ याबाबत प्रतिबंधात्मक उपाय योजना महापालिकेच्यावतीने राबवण्यात येत आहेत. तसेच ‘लॉकडाऊन’ काळात नागरिकांना किमान सोयीसुविधा योग्य प्रकारे मिळाव्यात यासाठी काही परिसरात तात्पुरत्या स्वरूपातील फळ – भाजी विक्री केंद्रे सुरू करण्यास दैनंदिन आणि तात्पुरत्या स्वरूपात परवानगी देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिले आहेत.

महापालिका आयुक्तांनी दिले सहायक आयुक्तांना निर्देश

मुंबई महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीदरम्यान महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी हे निर्देश दिले असून त्यानुसार तात्काळ आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्याचेही त्यांनी म्हटले आहे. मुंबईत दैनंदिन गरजेच्या भाजी, फळे इत्यादी खाद्य विषयक खरेदी करण्यासाठी नागरिक महापालिकेच्या मंडईत किंवा एकाच परिसरात ठराविक वेळी काही प्रमाणात गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्यामुळे ‘कोविड करोना १९’ संसर्गाची संभाव्यता वाढू शकते. हे टाळण्यासाठी भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे पर्याय तात्पुरत्या स्वरूपात वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतु, यानुसार तात्पुरत्या स्वरूपातील दोन भाजी विक्रेत्यांमधील अंतर हे किमान वीस फूट असेल याची काळजी घेण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. शिवाय त्याठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना आपापसात किमान साडेतीन फूट (१ मीटर) अंतर ठेवणे बंधनकारक असणार आहे. ही बाब लक्षात घेऊन त्या ठिकाणी पुरेशी जागा असल्याची खातरजमा झाल्यानंतरच तात्पुरत्या स्वरूपातील भाजी विक्रेत्यांना निश्चित वेळेत फळे, भाजी विकण्यास अनुमती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भाजी फळे विक्रेत्यांना ठिकाण ठरवून देणे, वेळ ठरवून देणे, नियमांची माहिती देणे आणि सदर नियमांचे काटेकोरपणे पालन होत असल्याची वेळोवेळी खातरजमा करणे आदी सर्व बाबतचे नियोजन व्यवस्थापन हे महापालिकेच्या विभागस्तरीय सहाय्यक आयुक्त यांच्या स्तरावर करण्याचे निर्देश देण्यात आले असून यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक यांचे सहकार्य घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.


हेही वाचा – नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट १५ एप्रिलपासून होणार सुरु


 

First Published on: April 13, 2020 7:21 PM
Exit mobile version