आदित्य ठाकरे यंग ग्लोबल लीडर्सच्या यादीत

आदित्य ठाकरे यंग ग्लोबल लीडर्सच्या यादीत

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या यंग ग्लोबल लीडर्स क्लास -2023 च्या नव्या यादीत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह 6 भारतीयांचा समावेश आहे. आदित्य ठाकरे यांच्या नावाचा पब्लिक फिगर गटात समावेश करण्यात आला आहे. समाज, देश, जगभरात सकारात्मक आणि चिरस्थायी बदलांसाठी काम करणारे राजकीय नेते, कल्पक उद्योजक, संशोधक आणि दूरदर्शी कार्यकर्ते अशा जवळपास 100 जणांचा या यादीत समावेश आहे.

40 वर्षांखालील तरुणांना एकमेकांकडून प्रेरणा घेता यावी आणि एकमेकांना विविध आव्हाने देता यावीत याकरिता यंग ग्लोबल लीडर्सचे व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे, जेणेकरून तरुणांनी केलेल्या नव्या कल्पनांचा जागतिक स्तरावर प्रचार होऊ शकेल. २००४ सालापासून ही यादी जाहीर केली जाते. आतापर्यंत १२० देशांतील १४०० पेक्षाही जास्त सदस्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. समाजकारण, आर्थिक उपाययोजना, तंत्रज्ञान, आरोग्य उपाययोजना, हवामान बदलासारख्या चळवळींमध्ये अग्रेसर असलेल्यांना यंग ग्लोबल लीडर्समध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने स्पष्ट केले आहे.

6 भारतीयांचा यादीत समावेश
यंग ग्लोबल लीडर्स क्लास -2023 यादीत वेगवेगळ्या गटांमध्ये 6 भारतीयांचा समावेश आहे. त्यामध्ये पब्लिक फिगर गटात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे तसेच भाजप युवा विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मधुकेश्वर देसाई यांचा समावेश आहे, तर उद्योग गटात जियो हॅप्टिक टेक्नॉलॉजीच्या आकृती वैश, टीव्हीएस मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू, बायझीनचे कार्यकारी संचालक विबिन जोसेफ आणि थिंक टँक गटात तन्वी रत्ना यांचा समावेश आहे.

First Published on: March 15, 2023 5:00 AM
Exit mobile version