कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा येवल्यात ठिय्या

कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा येवल्यात ठिय्या

कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री केल्यानंतर सोमवार (दि. २१) रोजी व्यापारी खळ्यावर कांद्याचे रोख पैसे मागितल्याच्या कारणावरून ममदापूर येथील कांदा उत्पादक शेतकरी अक्षय भाऊसाहेब गुडगे यांना कांदा व्यापारी रामेश्वर अट्टल यांचातला अरेरावीच्या व्हिडिओ तसेच भांडणामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर बुधवार (दि. २३) रोजी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत पदाधिकार्‍यांनी हे आंदोलन केले.

यावेळी कांदा उत्पादक शेतकरी अक्षय गुडघे हेही उपस्थित होते. येवल्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍याला मारहाण व दमबाजी झाल्यानंतर कांदा उत्पादक शेतकर्‍यांवर होणार्‍या अन्यायाला वेळीच वाचा फोडली नाही तर येणार्‍या काळात महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दमबाजी व बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद असे प्रकार सर्रास होत राहतील. अशी भूमिका कांदा संघटनेने घेतली.

एकीकडे ठिय्या आंदोलन करत असतानाही कांदा व्यापार्‍यांनी लिलावात सहभाग न घेतल्याने व त्यांनी लिलावात सहभाग घेऊ नयेत यासाठी बाजार समितीने त्यांना अप्रत्यक्ष मदत केल्याने उर्वरित कांदा व्यापार्‍यांनी कांद्याची कमी दरात लिलाव करण्यास सुरुवात केली. यामुळे शेतकर्‍यांनी स्वतः होऊन लिलाव बंद पाडून त्यांनी बाजार समितीकडे धाव घेतली व जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये जास्त व सरासरी भावात येवला बाजार समितीतील व्यापार्‍यांनी कांदा खरेदी करावा, अशी भूमिका दिघोळे यांनी घेतली.

यावेळी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, युवा जिल्हाध्यक्ष केदारनाथ नवले, युवा जिल्हा उपाध्यक्ष शेखर कापडणीस, येवला तालुकाध्यक्ष विजय भोरकडे, कोपरगाव तालुकाध्यक्ष वसंत देशमुख, कळवण तालुकाध्यक्ष विलास रौंदळ, नांदगाव युवा तालुकाध्यक्ष सोमनाथ मगर,कार्य कारणी सदस्य दिगंबर घोंडगे, मुन्ना पगार, भाऊसाहेब शिंदे, युवराज वाघ, कांदा उत्पादक शेतकरी नागेश जगताप, दशरथ भागवत,प्रवीण शिंदे, अनिल आंधळे यावेळी उपस्थित होते यावेळी येवला पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप कोळी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

First Published on: June 25, 2021 11:33 AM
Exit mobile version