मुंबईकरांनो हे काय केले? ध्वनीप्रदूषणात जिंकले, वायूप्रदूषणात हरले!

मुंबईकरांनो हे काय केले? ध्वनीप्रदूषणात जिंकले, वायूप्रदूषणात हरले!

मुंबईची हवा बिघडली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवळीमध्ये कमी आवाजाचे आणि कमी प्रमाणात फटाके वाजवण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं होतं. त्यानुसार मुंबई महानगर पालिकेने फक्त दिवाळीच्या दिवशीच फटाके वाजवण्याची परवानगी असल्याचं देखील जाहीर केलं होतं. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी ध्वनी प्रदूषण झाल्याचा निष्कर्ष नुकताच आवाज फाऊंडेशनने केलेल्या सर्वेमधून समोर आला आहे. त्यासाठी मुंबईवर कौतुकाची थाप पडत असतानाच याच प्रकारचा वायू प्रदूषणासंदर्भातला निष्कर्ष समोर आला आहे. यानुसार दिवाळीच्या दिवशी मुंबईत वायूप्रदूषण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झालं असलं, तरी इतर दिवशीच्या वायूप्रदूषणाचं प्रमाण हे गेल्यावर्षीपेक्षाही जास्त असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ध्वनीप्रदूषणात जिंकलेलं मुंबईकरांनी वायूप्रदूषणात गमावल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाके फोडण्याचं प्रमाण यंदा कमी झाल्यामुळे ध्वनीप्रदूषणासोबतच वायूप्रदूषण देखील कमी झाल्याचं दिसून आलं आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या आकडेवारीशी तुलना केली, तर दिवाळीचे दिवस वगळता इतर दिवशी मुंबईतलं वायूप्रदूषण हे गेल्या वर्षीपेक्षाही जास्त झाल्याचं दिसून आलं आहे. याला अनेक घटक कारणीभूत असले, तरी मुंबईकरांकडून वाहनांचा अतिरिक्त वापर, कारखाने, रस्ते, धूळ, धूर यामुळे हे वायूप्रदूषण वाढल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, यंदा कोरोनाच्या काळात लोकल सेवा बंद असल्यामुळे देखील रस्त्यावर जास्त संख्येने वाहने उतरल्याचं दिसून आल्यामुळे वायूप्रदूषणात वाढ झाली असावी, असं सांगितलं जात आहे.

दरम्यान, मुंबईतील वायू प्रदूषण ही गेल्या अनेक वर्षांची समस्या असून त्यावर अद्याप तोडगा मिळू शकलेला नाही. त्यामुळेच फक्त याच वर्षी किंवा यंदाच्याच दिवाळीत नव्हे, तर एरवीही मुंबईकरांनी प्रदूषणाविषयी सजग राहून सहकार्य करायला हवं, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

First Published on: November 17, 2020 7:09 PM
Exit mobile version