‘..तर ‘मनसे स्टाईल’ आंदोलन करू’ – अमित ठाकरेंनी दिला अल्टिमेटम

‘..तर ‘मनसे स्टाईल’ आंदोलन करू’ – अमित ठाकरेंनी दिला अल्टिमेटम

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे लोकलच्या प्रवाशांना मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. ऐन गर्दीच्या वेळी रेल्वेचा खोळंबा होणे, लोकल वेळापत्रकानुसार न चालणे, अनेक लोकल गाड्या रद्द होणे असे प्रकार घडताना पाहायला मिळाले. मात्र, पाऊस नसताना देखील लोकलच्या प्रवाशांना अशाच समस्यांचा सामना मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. वारंवार तक्रार करून देखील त्यावर कार्यवाही न झाल्यामुळे अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी प्रवाशांचे प्रश्न रेल्वे व्यवस्थापनापर्यंत पोहोचवण्यात पुढाकार घेतला आहे. त्यांनी स्वत: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रवाशांच्या समस्या आणि तक्रारी मांडणारं निवेदन रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना दिलं. त्याशिवाय, ३ महिन्यांचा अल्टिमेटम देखील दिला. जर ३ महिन्यात या समस्या सोडवण्यात अपयश आलं, तर ‘मनसे स्टाईल’ आंदोलन करण्यात येईल, असा थेट इशाराच या निवेदनात देण्यात आला आहे.

अमित ठाकरेंनी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली

अमित ठाकरेंनी केलं शिष्टमंडळाचं प्रतिनिधित्व

मुंबईची लाईफलाईन असलेल्या उपनगरीय रेल्वे अनियमित आणि विस्कळीत वेळापत्रकानुसार धावत असल्यामुळे कामावर लेटमार्क, शाळा-कॉलेजमध्ये उशीर होणे, वेळेत न पोहोचल्यामुळे क्वचित प्रकरणांमध्ये नोकरी गमवावी लागणे अशा समस्यांचा सामना मुंबईकरांना करावा लागत आहे. त्याचीच दखल घेऊन अमित ठाकरेंनी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासोबत मनसेच्या शिष्टमंडळासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट घेतली आणि त्यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं.

अमित ठाकरेंनी घेतली रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट

हेही वाचा – म्हणून अमित राज ठाकरेंचे भाषण कार्यकर्त्यांसोबत उभं राहून ऐकतो

निवेदनातील ६ मुद्दे

१. रेल्वे सेवा नियोजित वेळापत्रकानुसार चालावी
२. रेल्वे रद्द करण्याचे प्रमाण कमी करावे
३. गर्दीच्या वेळी महत्त्वाच्या स्थानकांदरम्यान विशेष ट्रेन चालवावी
४. महिला प्रवाशांसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करावे
५. रेल्वेस्थानकावरची प्रसाधनगृह स्वच्छ राखावीत
६. सर्व रेल्वे स्थानक आणि पादचारी पुलांवर गर्दीचे नियंत्रण आणि सूचना करण्यासाठी सुरक्षारक्षक नेमावेत

दरम्यान, हे निवेदन देताना अमित ठाकरे यांनी मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. या ६ बाबी पूर्ण करण्यासाठी ३ महिन्यांचा अल्टिमेटम रेल्वे प्रशासनाला देण्यात आला असून त्यात जर ही कामं झाली नाहीत, तर ‘मनसे स्टाईल’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील त्यांनी दिला.


हेही वाचा – डोंबिवलीकरांच्या लोकल कळा, स्वत: अमित ठाकरे मैदानात
First Published on: July 9, 2019 4:21 PM
Exit mobile version